टिवल्या-बावल्या : आमच्या विराटला सांभाळ रे, खंडेराया

>> शिरीष कणेकर

तुम्हाला एक गंमत सांगतो.

आपला विराट कोहली फलंदाजीला आला (या वाक्यात ‘आपला’वर जोर द्यावा. ‘तारीफ करू क्या उसकी’मध्ये महंमद रफी ‘ता’वर जोर देतो तसा!) की माझा मनातल्या मनात धावा सुरू होतो, – ‘देवा नारायणा, याला सतत ‘नॉन-स्ट्रायकर एंड’ला असू दे. मग तो आऊटच होणार नाही. (धावबाद वगैरे खुसपटं काढू नका. नतद्रष्ट कुठले!)

विख्यात इंग्लिश क्रिकेट-लेखक सर नेव्हिल कार्डस बालपणी झोपण्यापूर्वी व्हिक्टर ट्रंपर प्रेम व देशभक्ती दोन्हींचा सुवर्णमध्य काढण्याचा चतुर प्रयत्न करायचा. तो प्रार्थनेत म्हणायचा, – ‘परमेश्वरा! उद्याच्या कसोटी सामन्यात ट्रंपर शतक काढू दे आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सर्व बाद 137 होऊ दे.’ ट्रंपर खेळलेला बघण्याचा महानंद आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अगदीच तुटपुंजी राहिल्याचंही सुख.

कार्डस लहानपणी करायचा ते मी आता म्हातारपणी करतोय. त्याच्या प्रार्थनेचा पहिला अर्धा भाग मी स्वीकारलाय. विराट कोहलीच्या (त्याआधी सचिन तेंडुलकरच्या, त्याआधी सुनील गावस्करच्या, त्याआधी विजय मर्चंटच्या) भरपूर धावा व्हाव्यात यासाठी मी भैरवनाथाला साकडं घालतो. त्याच वेळी प्रतिस्पर्धी संघ व त्यांचे देशवासी क्रिकेटप्रेमी विराट कोहली लवकर जावा यासाठी देव पाण्यात ठेवत असतील. तिसऱया दिवसअखेर पर्थला हिंदुस्थानी संघ सामना जिंकू शकेल का यावर टी.व्ही.वर घनघोर चर्चा रंगात आली असताना माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्क तिला पूर्णविराम देत म्हणाला, – ‘याचं उत्तर अगदी सोपं आहे. कोहली खेळला तर त्याचा संघ जिंकेल. कोहली खेळला नाही तर त्याचा संघ हरेल.’ तेच झालं. कोहली खेळला नाही आणि त्याचा संघ हरला. संघाची अख्खी फलंदाजी एका माणसावर अवलंबून असल्याचे यापूर्वी कधी घडल्याचे स्मरत नाही. खुद्द ब्रॅडमनलाही कधी बिल पॉन्सफोर्डची, कधी स्टॅन मॅक्बेची तर कधी सिड बार्न्सची साथ लाभली होती. (तरीही कार्डस म्हणतो, – ‘ट्रंपर बाद झाल्यावर वाटायचं गरूड गेला, आता राहिलेत ते कावळे आणि गिधाडे!) सचिन तेंडुलकरलाही सेहवाग, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण यांची बहुमोल साथ होती. कोहलीनं कोणाच्या तोंडाकडे बघायचं? जे काही करायचं ते तो एकटाच करतो.

मग आईला लेकाची वाटते तशी मला कोहलीची काळजी का वाटते? (माईक टायसनच्या आईलाही त्याची अशीच काळजी वाटत असेल का?) सचिन तेंडुलकरच्या काळजीनंही माझ्या जिवाला असाच घोर लागून राहायचा. माझ्या काळजीवर व सदिच्छेवर तरून जायला ते काय पार्थसारथी शर्मा होते की वुक्केरी रामन होते? मी काळजी करावी इतके ते लेचेपेचे होते का? मग ते विश्वविक्रमी फलंदाज कसे झाले? काळजी करायला संघात के. एल. राहुल, मुरली विजय व अजिंक्य रहाणे आहेत ना? माझी काळजी नको त्या ठिकाणी मी वाया का घालवतोय?

या व इतर सगळय़ा समान प्रश्नांचं उत्तर एका शब्दात देता येईल – प्रेम! आपलाच मुलगा शाळेतून येताना हरवेल किंवा त्याला अपघात होईल अशी भीती आईला का वाटत असते? अतीव प्रेमापोटी आपल्या जिवाभावाचे लाडके फलंदाज कुठल्या तरी घातपातामुळे, ग्रहांच्या फेऱयांमुळे, अपघातानं बाद होऊ नयेत यासाठी जीव पाखडायचा अन् काय! आपल्या अगाध कर्तृत्वानं त्यांनी आपलं एकनिष्ठ प्रेम जिंकलेलं असतं. त्यांनी आपल्याला इतका भरभरून आनंद दिलाय, आपण त्यांच्यासाठी साधी प्रार्थना करायला काय लागतंय? प्रार्थनेतही बळ असतं म्हणे. मागल्या इंग्लंड दौऱयात जेम्स अँडरसनच्या आईची प्रार्थना फळाला आली होती; यंदा विराटच्या आईची. आम्ही आपले कोरसमध्ये गाणारे. विराटला किंवा सचिनला आम्ही मनापासून केलेल्या प्रार्थनेची जाणीव असेल का? मी एकदा जुहूला ‘दिलसुख’ नावाच्या गतिमंद मुलांच्या शाळेला भेट दिली होती. एक मुलगा कानाला ट्रांझिस्टर लावून एकाग्र चित्तानं कॉमेंटरी ऐकत होता. माझ्या मनात आलं की याला काय कळत असेल? ‘काय झाला स्कोअर?’ मी जरा आढय़तेनंच विचारलं, ‘आपले तीन आऊट झालेत.’ तो म्हणाला, ‘बरं डोंट वरी. सुनील गावस्कर इज स्टिल बॅटिंग.’

मला कळेना की याला गतिमंद का म्हणायचं!

विराट आणि सचिन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणत असताना मी कसली फतरे काळजी करतो? काय करणार, प्रेमनिर्भर मनाला डोळे नसतात. (किंवा मनाचे डोळे वेगळे असतात असं म्हणूया हवं तर.) रोहित शर्मा हेही माझं ‘प्रार्थना’स्थळ होतं. आता नाही. खेळायला आल्यापासून विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये चेंडू उचलून मारायचा नसतो, ‘ग्राऊंड स्ट्रोक्स’ म्हणूनही एक प्रकार असतो, हे रोहित शर्माच्या गळी कसं उतरवायचं? कसोटीमध्ये तो आपलं स्थान पक्कं करू शकत नाही ही गोष्टदेखील त्याचे डोळे उघडू शकत नसेल तर त्याला कधी आणि कशी जाग येणार? वास्तविक (एक दिवसीय व टी-20 सामन्यात) तो भरात येऊन मारत सुटला की कोहलीदेखील त्याच्यापुढे फिका वाटू लागतो, पण त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही, भरोसा करता येत नाही. तो आधारस्तंभ होऊ शकत नाही. कोहलीच्या बरोबरीनं आपण त्याचं नाव घेत नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात तो संघाचा कर्णधार आहे, कसोटीत तो असेल की नसेल सांगता येणार नाही. वाया गेलेल्या गुणी मुलाला आईबाप कठोरपणे ओवाळून टाकतात तसं काहीसं माझं रोहित शर्माच्या बाबतीत झालंय. अजून तो मार्गावर येईल, असं मन म्हणतं. दृष्ट लागण्यासारखा ‘गेम’ आहे त्याच्याकडे…

बघा, विराट खेळायला आलाय. तुम्ही खुर्चीत सावरून बसा. मी जपमाळ घेऊन बसतो…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या