Budget 2022 : 91.50 रुपये स्वस्त झाला गॅस सिलिंडर, जाणून घ्या सिलिंडर नवी किंमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यापूर्वी एक दिलासा देणारी बातमी आली. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दिल्लीत आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1907 रुपये असेल. नवीन दर आजपासून (1 फेब्रुवारी) लागू झाले आहेत.

तसेच, विपणन कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही कपात केलेली नाही. देशाची राजधानी नवी दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत 899.5 रुपयांवर कायम आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी) देखील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात 102.50 रुपये प्रति सिलेंडर कपात केली होती, तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या दरात कपात होणे अपेक्षित आहे. याआधी कंपन्यांनी 1 डिसेंबरला व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग केले होते.

गेल्या 90 दिवसांपासून तेल विपणन कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केलेला नाही. त्याचवेळी क्रूड सात वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर चालत आहे. सोमवारच्या व्यवहारात ब्रेंट क्रूडमध्येही कमालीची वाढ दिसून आली. जागतिक मानक मानले जाणारे ब्रेंट क्रूड 1.30 टक्क्यांनी वाढून 91.20 डॉलर प्रति बॅरल झाले. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.87 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 90.81 वर पोहोचले.