
सामना प्रतिनिधी । नांदेड
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणुकीच्या काळात अवैधरित्या येणारी दारु, गुटखा आणि तस्करीच्या माध्यमातून होणाऱ्या अवैध धंद्याबाबत तिन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा, असे आवाहन विभागीय सुनील केंद्रेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रेकर यांच्या उपस्थितीत सीमावर्ती भागात असलेल्या नांदेड, बिदर, आदिलाबाद, निर्मल, निजामाबाद या जिल्ह्यातील पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याठिकाणी लोकसभेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे तिन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी परस्पर देवाण घेवाण आणि गुन्हेगारीसंदर्भात माहिती देत असताना समन्वय ठेवावा. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रकमा, दारुची तस्करी, गुटखा आणि तंबाखूची सीमेवरुन होणारी वाहतूक याबाबतही सतर्कता बाळगावी. गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील लोकांचा वावर तसेच शस्त्रसाठ्याबाबतही डोळ्यात तेल घालून सीमेवर कडक कारवाई करावी अशा सूचना त्यांनी केल्या. सुरुवातीला विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी याबाबतचा आढावा सादर केला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्ह्यातील पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यासोबतच बिदर, निर्मल, आदिलाबाद, निजामाबाद या जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

























































