आनंदाचा शिधा ‘आधा’च! दिवाळी तोंडावर असूनही रवा, चणाडाळीची प्रतीक्षाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे-फडणवीस सरकारने दिवाळीत जाहीर केलेल्या आनंदाचा शिधाची सर्वसामान्यांना प्रतीक्षाच आहे. रवा, तेल, साखर आणि चणाडाळ शंभर रूपयात देण्याची घोषणा सरकाराने केली. त्याला आनंदाचा शिधा असं गोड नाव दिलं मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी हा आनंदाचा शिधा ‘आधा’ म्हणजे अर्धाच पोहचला आहे. तेल, साखर आहे तर चणाडाळ आणि रव्याचा पत्ता नाही अशी अवस्था येथे झाली आहे.

ज्या शिधापत्रिकाधारकांना 3 रूपये प्रति किलो तांदूळ आणि 2 रूपये प्रतिकिलो गहू मिळतो अशा शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्याची घोषणा सरकारने केली. त्यामध्ये 1 किलो चणाडाळ, 1 किलो रवा, 1 किलो साखर आणि 1 लीटर तेल फक्त शंभर रूपयात देण्याची घोषणा झाली. आनंदाचा शिधाची घोषणा झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक त्याकडे डोळे लावून बसले आहेत. दिवाळी तोंडावर आली तरी रेशनदुकानांवर या चार वस्तू पोहचलेल्या नाहीत. आनंदाचा शिधा आला का? हे विचारण्यासाठी ग्रामस्थ रेशनदुकानावर खेटे झिजवत आहेत.

2 लाख 75 हजार लाभार्थ्यांना वाटप कधी होणार

आनंदाचा शिधा मधील तेल आणि साखर काही प्रमाणात पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले आहे. चणाडाळीची मात्र अद्याप प्रतिक्षाच आहे. चणाडाळ घेऊन येणाऱ्या गाडीकडे जिल्हा पुरवठा विभाग डोळे लावून बसला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात 2 लाख 75 हजार लाभार्थी आहेत.उद्यापर्यंत हे धान्य रत्नागिरी जिल्ह्यात प्राप्त झाले तरी त्याचे वितरण कधी होणार आणि आनंदाच्या शिधाचा फराळ कधी बनणार याची चिंता सर्वसामान्यांना लागली आहे.