उपनगरीय लोकलचा ‘कल्लोळ’, चाकरमान्यांना रोजचा लेटमार्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेले काही दिवस सकाळच्या सत्रात गाड्या उशिराने धावत असल्याने कल्याणच्या पुढील प्रवाशांना सातत्याने लेटमार्क बसत आहे. मध्य रेल्वेच्या परळ स्थानकाजवळ रेल्वे ट्रकच्या शेजारील झाडांना आग लागल्याने सायंकाळच्या पिकअवरला फटका बसला, तर मुंबई सेंट्रलला लोकलने प्रवाशाला उडवल्याने पश्चिम रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम झाला.

मध्य रेल्वेच्या जलद सेवेच्या गाड्यांना मंगळवारी फटका बसला, तर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परळ लोको कारखान्याजवळ ट्रकशेजारील झाडांना आग लागल्याने गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना लोकलने एकाला उडवल्याने गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना सायंकाळी उशिराने घडल्याने गोंधळ उडाला. धीम्या मार्गावर रूळ दुरुस्तीचे काम सुरू असल्याने भायखळा ते चिंचपोकळी स्थानकादरम्यान लोकलच्या वेगावर बंधने आल्याने लोकल सेवेला फटका बसला, तर दुपारी 12.30  वाजण्याच्या सुमारास शहाड-आंबिवली स्थानकादरम्यान रेल्वे फाटक उघडे राहिल्याने त्याचा फटका लोकल फेर्‍यांना बसला. यामुळे कसारा दिशेने सीएसएमटीकडे येणार्‍या लोकल सुमारे 30 मिनिटांहून अधिक वेळ उशिराने धावत होत्या. याचा परिणाम मेल-एक्स्प्रेस फेर्‍यांना बसला.