स्वस्त डिझेलवर कंपन्यांचा डल्ला, गैरप्रकारांवर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी पार केल्याने सर्वसामान्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. देशातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांना इंधन मिळेनासे झाले आहे. यातच आता देशातील औद्योगिक कंपन्या बल्क सप्लायऐवजी थेट किरकोळ पेट्रोल पंपावरून स्वस्त दरात डिझेल खरेदी करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्या ठिकाणी असे गैरप्रकार होत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये चढ-उतार होत आहेत. मागील काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाल्याने इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हा संपूर्ण गैरप्रकार रिटेल आणि बल्क डिझेलच्या किंमतीमधील एका मोठ्या फरकामुळे सुरू झाला आहे. 28 मेच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सर्वसामान्यांसाठी रिटेल डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आहे. तर उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बल्क डिझेलचा दर 149 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. या दोन्हीमध्ये 54 रुपयांचा फरक आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार ठरतात, तर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी रिटेल किंमतीवर सरकारचे नियंत्रण असते. यामुळेच उद्योगांनी गैरफायदा घेण्यासाठी बल्क कोटा सोडून सामान्य पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला आहे. दरम्यान, इंधनाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी विक्रीवर कंपन्यांना दररोज सरासरी 550 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.