
राज्यात सध्या मराठी शाळांवर संकट ओढविले असून मराठी शाळांना मान्यता मिळताना होणारा अन्याय, पटसंख्येअभावी शाळांचे समायोजन किंवा शाळा बंद करण्याचा विचार यामुळे सध्या मराठी शाळा संस्थाचालक अडचणीत सापडले आहेत. शिक्षण क्षेत्रातील अशा विविध मुद्दय़ांवर भाष्य करण्यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया संस्थांना सोबत घेऊन सांगा, आम्ही कसे शिकवायचे? ही राज्यस्तरीय परिषद येत्या 6 नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये होणार आहे.
मराठी अभ्यास केंद्र संलग्न मराठी शाळा संस्थाचालक संघ, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ही राज्यस्तरीय परिषद घेण्यात येणार आहेत. शिक्षणातले प्रश्न वर्षानुवर्षे सुटताना दिसत नाहीत. यामध्ये शिक्षक भरती न होणे, वेळेवर अनुदान/वेतनेतर अनुदान न देणे, पेन्शनचा मुद्दा, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना न दिसणे असे असंख्य प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांवर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया संस्थेच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याची तसेच भूमिका स्पष्ट करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषेदच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांच्या मागणीचा सरकारकडे एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी तसेच तातडीने सरकारचे लक्ष मराठी शाळांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी केले आहे. ही परिषद 6 नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पसमधील आयसीएसएसआर सभागृहात होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क -9604523666


























































