
अमित खोत, मालवण
डबलबारी भजनातून दशावतार कलेचे विडंबन होत असल्याच्या कारणावरून गेली दोन वर्ष चालू असलेला भजनी बुवा आणि दशावतार कलाकार यांच्यातील वाद अखेर संपुष्टात आला आहे. भजनात दशावतार सादर होत असल्यावरून दशावतारी कलाकारांनी विरोध दर्शविल्यानंतर कणकवली येथे भजनी बुवांच्या झालेल्या बैठकीत भजन कलेत दशावताराचे कोणतेही विडंबन व सादरीकरण केले जाणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
२०-२० भजन डबलबारी मधून दशावताराचे काही बुवांकडून होणारे विडंबन व सादरीकरण याला दशावतारी कलाकारांनी विरोध दर्शविला होता. यावरून दशावतारी कलाकार व भजनी बुवा यांच्यात वाद सुरू होता. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा लोक नाट्य मंडळ (दशावतार) संघटनेने सिंधू- रत्न संगीत भजनोत्कर्ष मंडळाला लेखी पत्र देऊन भजनातील दशावतार सादरीकरण थांबविण्याची विनंती केली होती. मात्र तरीही काही भजनी बुवांनी दशावताराचे सादरीकरण भजनबारी मध्ये चालू ठेवल्याने हा वाद वाढला. अखेर दशावतार संघटनेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधण्याचा इशारा दिला. त्यामुळे काही सुजाण बुवांनी यावर तोडगा काढण्यासाठी १५ जून पर्यंत दशावतारी कलाकारांना थांबण्याची विनंती केली होती. इतर ज्येष्ठ बुवांशी सल्ला मसलत करून निर्णय देतो असे पत्र दिल्याने सहिष्णुता म्हणून दशावतार संघटनेने १५ जून पर्यंत थांबण्याचे मान्य केले.
दरम्यान, कणकवली येथे नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच व मुंबईतील काही भजनी बुवांची बैठक संपन्न झाली. यापुढे भजनात दशावतार कलेचे कोणतेही विडंबन व सादरीकरण करण्यात येणार नाही असा सर्वांनुमते निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच कोणत्याही बुवाने भजनातून दशावताराचे विडंबन व दशवताराला गालबोट लागेल असा प्रयत्न केल्यास ती त्याची वैयक्तिक जबाबदारी राहील. दोन्ही संघटनेच्या विरोधात कोणी बुवा आचरण करताना आढळल्यास त्यावर दोन्ही संघटनेमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल. असे भजनी बुवांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचे लेखी पत्र भजन संघटनेचे अध्यक्ष बुवा भालचंद्र केळुसकर यांनी दशावतार संघटनेला देऊन यापुढे कोणीही भजनी बुवा भजनात दशावताराचे विडंबन व सादरीकरण करणार नाही असे भजनी बुवांच्या वतीने आश्वासित केले आहे.
भजन संघटनेच्या या निर्णयाचे आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या साऱ्या बुवांचे दशावतार संघटनेचे अध्यक्ष बाळा सावंत आणि दशावतार कलाकार यांनी आभार व्यक्त केले आहे. भजनी बुवांनी घेतलेल्या निर्णयाचे मुंबई मधील दशावतार कलाकारांनीही स्वागत केले आहे. अखेर सर्व वाद मिटल्याने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना पत्रक देण्याचा निर्णय दशावतार संघटनेकडून रद्द करण्यात आला आहे.
































































