भाजपने आमची 6 सरकारे चोरली – मल्लिकार्जुन खर्गे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकांनी काँग्रेस पक्ष निवडला, आम्हाला आशीर्वाद दिला, पण भाजपने आमच्या पक्षातील अनेक लोकांना धमकावून पळवून नेले. भाजपने आमची 6 सरकारे चोरली आणि स्वतःची सत्ता स्थापन केली. आता आम्ही भाजपला चोर…डाकू म्हणावं की काय म्हणावं? असा टोला कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुरुवारी पठाणकोटला पोहोचली. यावेळी खर्गे यांनी केंद्रातील मोदी सरकार व भाजपवर जोरदार निशाणा साधला. खर्गे म्हणाले, जनतेने काँग्रेसच्या ज्या लोकांना निवडून दिलं, ती भाजपने चोरली. काहींना पैसे दिले, काहींना ईडी-इन्कम टॅक्सची भीती दाखवून भाजपमध्ये घेतले, असा आरोप त्यांनी केला.

कन्याकुमारी ते कश्मीर अशी सुरू झालेली भारत जोडो यात्रा ही देशातील जनतेला जोडणारी आहे. आज भाजप सरकार, आरएसएसचे लोक समाजाला तोडत आहेत. त्यामुळे या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या उणिवा लोकांना सांगण्यासाठीच राहुल गांधी आले आहेत, असे खर्गे म्हणाले.