संशयातून चार जणांना बेदम मारहाण, काँग्रेस नगरसेवकाचा प्रताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमनेर

पाठलाग करीत असल्याच्या संशयावरुन चौघांना मारहाण करण्याची घटना मंगळवारी संगमनेरात घडली. आरोपींनी तरुणाला उचलून नेत जोर्वे नाक्याजवळील आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागे नेले, त्याला वाचवण्यासाठी त्यापाठोपाठ गेलेल्या तिघांनाही जमावाने बेदम मारहाण केली. यावेळी विद्यमान नगरसेवकाने एका तरुणाच्या छातीवर चॉपर ठेऊन त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर संगमनेरात जातीय तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी १२ आरोपींसह ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघांना बुधवारी अटक करण्यात आली असून उर्वरीत आरोपींचा कसून शोध सुरु आहे.

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी आशुतोष शरद भुजबळ (वय २४, रा.लक्ष्मीनगर) हा तरुण निमगावहून संगमनेरकडे येत होता. यावेळी पाठीमागून आलेल्या पीकअप वाहनाची ताडपत्री बांधण्याची पद्धत पाहून त्यात गोवंश जनावरे असल्याचा त्याला संशय आल्याने त्याने याबाबतची माहिती मोबाईलद्वारे बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सचिन कानकाटे यांना दिली. कानकाटे यांनी संगमनेर खुर्दच्या अशोक शिंदे यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याच्याशी संपर्क असताना भुजबळ बायपासच्या भुयारी मार्गापर्यंत पोहोचला. त्याचवेळी दोघांनी त्याला अडवून ‘तु पीकअप का पीछा क्यो कर रहा है?, तुने किसको फोन किया?’ असे म्हणत त्याच्या खिशातील मोबाईल काढून घेतला आणि मारहाण केली. त्यानंतर त्याला जोर्वे नाक्याजवळील आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस नेण्यात आले. तेथे त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी या घटनेचा आरोपी नगरसेवक रिझवान शेख उर्फ मंत्री याने ‘तु सचिन कानकाटेला येथे बोलव, तरच तुला सोडू’ असे सांगत त्याला फोन करण्यास भाग पाडले. घटनेतील मुख्य आरोपी रिझवान शेख उर्फ मंत्री हा संगमनेर नगर पालिकेचा काँग्रेस पक्षाचा स्विकृत नगरसेवक आहे.

भुजबळ याने कानकाटेला फोन करीत घडला प्रकार सांगितला. त्यावर तेथे पोलीस येत असल्याचे सांगत कानकाटे याने पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधून त्यांना घडला प्रकार सांगितला. त्याच दरम्यान भुजबळचा शोध घेत त्याचे मित्र अजित अंकुश भारते, मंगेश राजेंद्र वाव्हळ व विनय मंगेश वालझाडे हे तिघे तिथे पोहोचले. या सर्वांनाच जमावाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रिझवान शेख याने अजित भारतेच्या छातीला चॉपर लावला व त्याची मान पकडून त्याला खाली पाडले. याचवेळी पोलिसांचे वाहन तेथे पोहोचले आणि जमाव पसार झाला.

या प्रकरणी आशुतोष शरद भुजबळ याने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गु.र.नं. १९७/२०१८ भा.द.वी.कलम ३४१, ३२७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ व भारतीय शस्त्र कायद्याचे कलम ४/२५ प्रमाणे आरोपी रिझवान शेख उर्फ मंत्री, झाकीर अन्वर कुरेशी, नवाज जावेद कुरेशी, सुफियान नसीर कुरेशी, अजमल लतीफ कुरेशी, लाला रज्जाक कुरेशी, तौसिफ असिफ कुरेशी, हुजैफ आदिक कुरेशी, सोहेल फैरोज कुरेशी, जफर उमर कुरेशी कासिफ असद कुरेशी, वाहीद अब्दुलकरीम कुरेशी यांच्यासह ४० ते ५० अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोहेल फैरोज कुरेशी व कासिफ असद कुरेशी या दोघांना अटक करण्यात आली आहे.