
महाराष्ट्र व उत्तर हिंदुस्थानींना कोरोना प्रेडर म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रद्रोही म्हणून राज्यातील भाजप खासदार, आमदार व केेंद्रीय मंत्री व नेत्यांच्या घरासमोर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन पुकारण्यात आले. यामध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व अन्य नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते. मुंबई, नागपूरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महाराष्ट्र व उत्तर हिंदुस्थानींचा कोरोना सुपरप्रेडर म्हणून लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अपमान करीत असताना राज्यातील भाजपचे खासदार टाळ्या वाजवत होते हे अतिशय निषेधार्ह आहे. हा अपमान महाराष्ट्र व उत्तर हिंदुस्थानी जनता कदापि सहन करणार नाही. उत्तर प्रदेश आणि मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला धडा शिकवून या अपमानाचा ते बदला घेतील, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले की, पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा केलेला अपमान आम्ही सहन करणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविरोधात आंदोलन करत राहू. राज्यातील भाजपचे नेते, खासदार, आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करू.



























































