शिवरायांच्या स्मारकाचे सहा वर्षांपूर्वी भूमिपूजन केले त्याचे काय झाले? नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुसतेच भूमिपूजन करतात आणि भारतीय जनता पार्टी जाहिरातबाजी करते. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजनही मोदींनी केले होते. त्याला सहा वर्षे उलटली. स्मारकाचे पुढे काय झाले, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. पंतप्रधान मोदींनी मुंबईच्या सभेमध्ये महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांवरही बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले जाणार आहे. त्या  कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. मोदींच्या मुंबई दौऱयासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पटोले बोलत होते.

विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल. काँग्रेसमध्ये काहीही गडबड नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दावोसपेक्षा गुजरातला गेले असते तर बरे झाले असते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱयासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले. त्यामुळे दावोसला जाण्यापेक्षा गुजरातमध्ये गेले असते तर बरे झाले असते. करार होतच राहतात, गुंतवणूक किती आली हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.