टप्प्याटप्प्याने अवघा महाराष्ट्रच भगवा करू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्ष वाढतोय, नवे सहकारी-सोबती शिवसेनेत येताहेत. या सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचं प्राबल्य आहे. निर्मला गावीत यांच्या प्रवेशानंतर हा संपूर्ण पट्टा भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही. पण टप्प्याटप्प्याने अवघा महाराष्ट्राचा पट्टाच भगवामय करू, असे उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले.

काँग्रेस आमदार निर्मला गावीत तसेच राष्ट्रवादीच्या करमाळा येथील पदाधिकारी रश्मी बागल यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांसोबत बोलत होते. विधानसभेत शिवसेना किती जागा जिंकेल या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, किती जागा जिंकता येतील याचा अंदाज मी कधीही बांधत बसत नाही. काम करत राहायचं हीच मला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे. त्यामुळे अंदाज लावत बसायचं नाही, जिंकायचं म्हणजे जिंकायचं. यावेळी छगन भुजबळ तसेच अन्य प्रवेशांविषयी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी, चर्चा रंगवणारे तुम्ही आहात. प्रत्येक प्रश्नाला योग्य वेळी उत्तरे मिळतील, असे सांगितले.

आमचं ठरलंय

अमित शहांसोबत चर्चा झाली का, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व गोष्टी चालू आहेत़  सर्वत्र आनंदीआनंद आहे. शिवसेना-भाजपची युती आहेच. आणि आमचं ठरलंय.

इनकमिंग काँग्रेस–राष्ट्रवादीतून,निर्मला गावीत, रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेस व राष्ट्रवादीतून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावीत तसेच करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या माजी आमदार रश्मी बागल यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांची कन्या निर्मला गावीत यांनी त्यांची मुलगी नयना गावीत, मुलगा हर्षल गावीत व शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी राज्यमंत्री दिगंबर बागल यांची कन्या रश्मी बागल यांनी बंधू दिग्विजय बागल व समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून तसेच हाती भगवा देऊन या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेनेची ही एकजूट कायम ठेवा आणि विधानसभेसाठी कामाला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. यावेळी शिवसेना नेते–उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार रूपेश म्हात्रे आदी उपस्थित होते. पक्षप्रवेशाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, आज महत्त्वाचा दिवस आहे. निर्मला गावीत तसेच रश्मी बागल यांचा कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश झाला आहे. निर्मला गावीत या नंदुरबारपासून इगतपुरीपर्यंत पक्षबांधणीसाठी काम करतील, असे सांगितले. रश्मी बागल यांच्यासोबत आदिनाथ व मकाई या दोन्ही साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह 35-36 संचालक. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व सात–आठ संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सर्व तालुका कार्यकारिणी तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आजी–माजी सदस्य, माजी सभापती, उपसभापती यांच्यासह संपूर्ण बागल गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.