युवक काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी अनुवादीत केलेल्या सिटीझनविल पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरांमध्ये होणारे स्थलांतर हे प्रगतीचे लक्षण असून शहरीकरण आणि स्थलांतर आजवर कुणीही थांबवू शकलेले नाही. या स्थलांतरामुळे भविष्यात काय होईल याचा वेध वेळीच न घेतल्याने आपली शहरे बकाल झाली असून शहरविकासाचे नियोजन योग्य वेळी झाले तर मानवी जीवन समृद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काँग्रेसचे युवक नेते सत्यजित तांबे यांनी अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी हे पुस्तक लिहिले आहे. यावेळी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, गौर गोपाल दास, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशीष चौहान, आमदार यशोमती ठाकूर, अमरीश पटेल, भाजपा आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

गॅविन न्यूसम यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को शहराचे गव्हर्नर असताना तेथील नागरिकांना काय हवे आहे याचा अभ्यास करून त्या अनुषंगाने शहराचा विकास केला. त्यावर आधारित हे पुस्तक आहे. या पुस्तकाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘प्रत्येक युगाची वेगळी मूल्ये आणि उपकरणे असतात. ती लक्षात घेतली नाहीत तर ते युग कालबाह्य होते. शहरीकरणाच्या असुविधांवर मात करायची असेल तर नागरी सुविधा सर्वोत्तम कराव्या लागतील. त्यासाठीच देशातील शहरांमधील पायाभूत सुविधांवर प्रचंड मोठी गुंतवणूक सुरू आहे असे सांगतानाच, भविष्यात जगातील पहिल्या तीन देशांत हिंदुस्थानचा समावेश असेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

सत्यजितवर आमचा डोळा…
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणादरम्यान एक राजकीय कोपरखळी मारली. ते म्हणाले, सत्यजित यांची ही दृष्टी राजकारणात महत्त्वाची आहे; पण बाळासाहेब, अशा प्रकारचे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस ठेवू नका, नाहीतर अशा नेत्यांवर आमचाही डोळा असतो.’ यावर सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी शिट्टय़ा वाजवत फडणवीस यांना दाद दिली.