काँग्रेस खतरनाक खेळ खेळत आहे, निर्मला सीतारमण यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nirmala-sitharam-pti

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विजयी झाल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. थरूर यांच्या वक्तव्याला उत्तर देताना ‘काँग्रेस एक खतरनाक खेळ खेळत आहे’, असा गंभीर आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

शशी थरूरच्या तोंडाला काळे फासण्यासाठी मुस्लीम तरुणाने ठेवले बक्षिस

अग्रलेख : संघाचाच अजेंडा, शशी थरुरचे करायचे काय?

‘काँग्रेस पक्ष एक खतरनाक खेळ खेळत आहे. काँग्रेस धार्मिक कार्ड खेळत आहे. यामुळे समाजात दुफळी माजून विभाजन होईल आणि सांप्रदायिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. १९४७ च्या विभाजनावेळीही असेच घडले होते. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीवेळी काही अघटीत घडल्यास त्याला सर्वस्वी काँग्रेस पक्ष जबाबदार असणार आहे’, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.

काय म्हणाले शशी थरूर?
‘जर २०१९ मध्ये भाजप लोकसभा निवडणूक जिंकली तर ते देशाचे संविधानच बदलून टाकतील. आपल्या संविधानातील एक एक कायदे धाब्यावर बसवून ते देशासाठी नवीन संविधान तयार करतील. हे नवीन संविधान हिंदू राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीने तयार केलेलं असेल. त्यानंतर अल्पसंख्याकांना समानतेने वागणूक मिळणार नाही, त्यांचे सर्व हक्क काढून घेतले जातील. त्यानंतर हा देश हिंदू पाकिस्तान होऊन जाईल. अशा देशासाठी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलंय’, अशा शब्दात थरूर यांनी भाजपवर टीका केली होती.