त्यांनी जे काही केलं ते 40 टक्के कमिशनसाठी केलं, राहुल गांधींचे भाजपवर टिकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-new

कर्नाटकची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्व पक्षांच्या प्रचाराला जोर आला आहे. रविवारी कर्नाटकच्या कोलार भागात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा अदाणीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. तसेच कर्नाटकात देखील भाजपने जे काही केलं त्यांत 40 टक्के कमिशन खाल्ल असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

”अदाणींची कंपनी ही शेल कंपनी आहे. या कंपनीतले 20 हजार कोटी कुणाचे आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. आपण आतापर्यंत पाहिलंय की सरकारला घेरताना विरोधक संसदेचं कामकाज बंद पाडतात. मात्र हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षच संसदेचं काम होऊ देत नाहीए. मंत्रीच कामकाज थांबवत आहेत. मी लोकसभेच्या अध्यक्षांना याबाबत दोन वेळा पत्र लिहून सांगितले. माझ्यावर झालेल्या आरोपांवर मला बोलायचं आहे. पण मला बोलायची संधी दिली गेली नाही. ते माझ्यावर हसत होते आणि मी काहीच करू शकत नाही असंही त्यांनी सांगितले. मी म्हणालो की तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्ही संसदेत काहीही करू शकता, पण तुम्ही तरीही तुमचं काम का करत नाहीत? ते अदाणी प्रकरण संसदेत आणण्यास घाबरत होते. त्यानंतर माझी खासदारकीच रद्द झाली” असं राहुल गांधी यांनी सांगितले.

”कर्नाटकात भाजप सरकारने काय काम केलं आहे? त्यांनी 40 टक्के कमिशन खाल्लं. काम करण्यासाठी भाजपा सरकारने कर्नाटकातील लोकांच्या पैशांची चोरी केली. त्यांनी जे काही केलं ते 40 टक्के कमिशनसाठी केलं. हे मी बोलत नसून कंत्राटदारांच्या संघटनांनी पंतप्रधांनाना पत्र लिहून कळवलं आहे. पंतप्रधानांनी या पत्राचंही उत्तर दिलेलं नाही. पत्राचं उत्तर न देण्याचा अर्थ असा की पंतप्रधानांनासुद्धा कर्नाटकातील 40 टक्के कमिशन मान्य आहे.” अशा शब्दात त्यांनी भाजपला फटकारले आहे,