
सामना प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या मतमोजणीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यापासून नवीन प्रदेशाध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान. 20 मे रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन विरोधी पक्षनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेला विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे येत्या सोमवारी मुंबईत येत आहेत. या बैठकीत राज्यातल्या वेगवेगळय़ा प्रश्नांवर तसेच विरोधी पक्षनेतेच्या नावावर चर्चा होणार आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा पाठवून दिला आहे. पण विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर करावा लागेल. त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा राधाकृष्ण विखे-पाटील हेच सध्या विरोधी पक्षनेते आहेत.
येत्या 17 जून रोजी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवीन विरोधी पक्षनेते पदाच्या निवडणुकीचा काँग्रेस पक्षाला निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे 20 मे रोजी होणाऱया बैठकीत नवीन विरोधी पक्षनेते पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.





























































