सत्यजीत तांबे यांचे निलंबन निश्चित, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा

पक्षाला गाफील ठेवत ऐनवेळी दगाफटका करणाऱ्या सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे. आजच त्यांचे निलंबन करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेतली.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी मविआने 5 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले, अमरावती विभागात धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील, कोकणमध्ये बाळाराम पाटील असे 5 आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत असे नाना पटोले यांनी सांगितले. मविआ म्हणून आम्ही या पाचही निवडणुका जिंकू असे ते म्हणाले. जगात सगळ्यात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपला नाशिकमध्ये साधा उमेदवारही सापडला नाही असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, मुंबईत आज गटारांचीही उद्घाटने होत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते गटारांची उद्घाटने करणे म्हणजे त्यांच्या पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासारखे आहे. मुंबईत येत असताना पंतप्रधानांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारत अद्याप का झाले नाही, महाराष्ट्राच्या दैवतांचा राज्यपाल असो वा भाजपच्या अन्य नेत्यांना सातत्याने अपमान केला आहे, त्यांच्यावर काय कारवाई केली, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला का पळवून नेले याची उत्तरे पंतप्रधानांना द्यावी लागतील असे नाना पटोले म्हणाले.