सलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्तीचा विक्रम, नवे रुग्ण 83,347 तर बरे झाले 89,746

देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत कोरोनाचे 83,347 नवीन रुग्ण आढळले. याचवेळी 89,746 लोक कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. त्यामुळे देशातील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 45 लाख 87 हजार 614 वर पोहोचली आहे. तसेच रिकव्हरी रेट 81.25 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे.

मागील पाच दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांचे प्रमाण घटले आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारले आहे. मंगळवारी एका दिवसात तब्बल एक लाखाहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तीत जगात हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक आकडेवारीत हिंदुस्थानात बरे झालेल्या लोकांची संख्या 19.5 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात 1085 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

– देशात कोरोना चाचण्यांची क्षमता प्रतिदिन 12 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत एकूण साडेसहा कोटींहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. विषाणू संसर्गाचे वेळीच निदान करणे हे यामागील सरकारचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या