‘आरएसएस’बाबत वादग्रस्त विधान; गीतकार जावेद अख्तर यांना मुलुंड कोर्टाचे पुन्हा समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (आरएसएस) वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात बॉलीवूड गीतकार जावेद अख्तर यांना गुरुवारी मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयाने पुन्हा समन्स बजावले. गेल्या महिन्यात सत्र न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळली होती. अख्तर यांनी दोन वर्षांपूर्वी न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. तालिबानी रानटी असून आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे समर्थन करणारे लोक त्यांच्यासारखेच आहेत, असे विधान अख्तर यांनी केले होते.

या प्रकरणी अॅड. संतोष दुबे यांनी अख्तर यांच्याविरोधात 100 कोटींचा फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याची सध्या मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अख्तर यांनी सत्र न्यायालयात समन्सविरोधात दाखल केलेले अपील गेल्या महिन्यात फेटाळण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयाने अख्तर यांना नव्याने समन्स बजावून 20 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.