पोलिसांना सहकार्य करा, सूचना पाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलिसांनी दसरा मेळाव्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे मेळाव्याला येणाऱया शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी तंतोतंत पालन करावे व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.

जेवणाचे डबे, बॅगा आणू नका

मेळाव्याला येताना जेवणाचे डबे, बॅगा अथवा कोणतीही वस्तू घेऊन मैदानात येऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. मैदानात प्रवेश करताना पोलिसांकडून सुरक्षा तपासणी होणार आहे. त्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पार्किंग कुठे कराल?

शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची वाहने सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक या ठिकाणी सोडून त्यानंतर सदरची वाहने शिवाजी पार्क येथील कामगार क्रीडा भवन, वनिता समाज, संयुक्त महाराष्ट्र दालन, वीर सावरकर स्मारक येथे पार्क करावीत.

पश्चिम व उत्तर उपनगरातून येणाऱया मोठय़ा वाहनांतून (उदा. बसेस, टेम्पो इत्यादी) कार्यकर्त्यांना माहीम जंक्शन येथे डावे वळण देऊन मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावरुन बाळ गोविंददास मार्ग जंक्शनपर्यंत नेऊन वाहने पार्क करून सभेसाठी जावे. जीप अथवा कार एल. जे. रोडने राजा बढे चौकापर्यंत न्यावीत व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने जे. के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे पार्ंकगकरिता पाठवावीत.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो व बस इत्यादी) शीव जंक्शन येथून उजवे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने ‘वाय’ जंक्शन, ‘टी’ जंक्शन मार्गे धारावी-माहीम लिंक रोडने सेनापती बापट मार्गावर जातील. वाहनातील कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने सेनापती बापट रोडवर पार्ंकगकरिता पाठवावीत.

दक्षिण मुंबईतून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस इत्यादी) डॉ. ऍनी बेझंट मार्गे काशीनाथ घाणेकर जंक्शन (रवींद्र नाटय़मंदिर)पर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सयानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्ंकग करतील.

पोलिसांच्या सूचना

वीर सावरकर मार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच सर्व शिवसेना नेत्यांचे आमगन होणार असल्याने शिवसैनिकांनी या मार्गावर वाहने घेऊन येऊ नयेत.

शिवसेना उपनेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, निमंत्रित यांच्या आसन व्यवस्थेकरिता कालिकामाता मंदिराच्या शेजारून तसेच स्काऊट पॅव्हेलियनच्या बाजूने प्रवेश देण्यात येईल.

शिवसेना नेते व व्यासपीठावरील मान्यवरांसाठी वीर सावरकर मार्गावरील उद्यान गणेश मंदिरापुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या शेजारून प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅमेरामन व वृत्तपत्र प्रतिनिधी यांना समर्थ व्यायाम मंदिराकडून प्रवेश देण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ‘ओबी व्हॅन’ समर्थ व्यायाम मंदिर परिसरातच उभ्या कराव्यात.

बसेस, टेम्पो, टॅव्हलर्स, मोठे टेम्पो

  • संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर
  • कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग
  • माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन
  • पाच गार्डन, माटुंगा
  • एडनवाला रोड, माटुंगा
  • नाथालाल पारेख, माटुंगा
  • आर. ए. के. रोड, वडाळा

चारचाकी हलकी वाहने

  • इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर
  • इंडिया बुल्स 1 सेंटर, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन, सेनापती बापट मार्ग, दादर
  • कोहिनूर वाहनतळ, जे. के. सावंत मार्ग, शिवाजी पार्क

शिवसैनिकांना आवाहन… तुमचा प्रत्येक जीव मोलाचा आहे…

दसरा मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून लाखोंच्या संख्येने मुंबईत येणाऱया शिवसैनिकांना आज नम्र आवाहन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांचे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या साक्षीने भगव्याचे वादळ अनुभवण्याची, त्यात सामील होण्याची ओढ सर्वांनाच आहे. प्रत्येक जण उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी, पुढचा मार्ग समजून घेण्यासाठी, माजलेल्या सत्तांध रावणावर हजारोंची वज्रमूठ उगारण्यासाठी आतूर आहे. हा जोश, हा उत्साह, हे स्फुरण घेऊनच तुम्ही या, पण स्वतःची काळजी घेऊन या, असे आवाहन शिवसेनेने ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. प्रवास लांबचा आहे… रेल्वेने, एसटीने, खासगी गाडीने येताय, पण सांभाळून या! घाई करू नका, वाहने सावकाश हाका… दिवस कडक उन्हाचे, उकाडय़ाचे आहेत, त्यामुळे तब्येतीला सांभाळा. जवळ पाण्याची बाटली ठेवा. उपाशी राहू नका. उन्हापासून स्वतःला सांभाळा. आपला दसरा मेळावा महत्त्वाचा आहेच, पण तितकाच मोलाचा तुमचा प्रत्येकाचा जीव आहे! त्याचं मोल अधिक आहे… एकमेकांची काळजी घ्या, शिस्तीने आणि उत्साहाने या! आम्ही वाट पाहतोय, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.