
रिटकवली येथील ‘महालक्ष्मी शेवचिवडा रिटकवली’ या नोंदणीकृत व्यापारी चिन्ह असणाऱ्या चिवडा उत्पादकाच्या नावाशी साधर्म्य ठेवत ‘शुभलक्ष्मी शेवचिवडा रिटकवली’ या नावाने उत्पादन घेणाऱ्या संतोष विष्णू मर्ढेकर, निखिल शहा यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश पोलिसांना मेढा येथील न्यायालयाने दिले आहेत.
रिटकवली येथील महालक्ष्मी शेवचिवडा हे उत्पादन श्यामराव मर्ढेकर व अरुण मर्ढेकर हे घेत आहेत. त्यांच्या नावाशी मिळतेजुळते नाव धारण करत मेढा येथे संतोष विष्णू मर्ढेकर यांनी शुभलक्ष्मी शेवचिवडा रिटकवली या नावाने चिवडा बाजारपेठेत आणला. नामसाधर्म्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याने अरुण मर्ढेकर यांनी मेढा न्यायालयात संतोष विष्णू मर्ढेकर व सहकारी निखिल शहा यांच्या विरोधात खटला दाखल केला होता.
न्यायालयाने अरुण मर्ढेकर यांचे म्हणणे, तसेच पुरावे प्रथमदर्शनी ग्राह्य मानत संतोष मर्ढेकर, निखिल शहांविरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश मेढा पोलिसांना दिले आहेत.
























































