कोरोना आणि सायबर डिस्टन्सिंग!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हणकर 

‘कोरोना महामारी’च्या या चिंतेच्या काळात आपण ज्या प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेत आहोत, नियमांचे पालन करत आहोत अगदी तशीच काळजी आपल्या वैयक्तिक माहितीची, आपल्या कष्टाच्या कमाईचीदेखील घेणे आता तेवढेच आवश्यक झाले आहे. अशा गुन्हेगारांपासून ‘सायबर डिस्टन्सिंग’देखील गरजेचे आहे हेच खरे!

‘कोरोना’च्या आडून सायबर हल्ल्यांचे प्रमाणदेखील प्रचंड वाढलेले आहे. ही एक नवीन गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आधीच ‘कोरोना महामारी’ने त्रस्त असलेल्या लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांच्या पैशावरती आणि वैयक्तिक माहितीवरती ऑनलाईन पद्धतीने डल्ला मारण्याचे प्रकार संपूर्ण जगात मोठय़ा प्रमाणावरती वाढलेले असून यात शिकार झालेल्या लोकांची अवस्था ‘आगीतून फुफाटय़ात’ अशी झालेली आहे. आपल्या देशात चालू असलेल्या या सायबर फसवणुकीचे काही प्रमुख प्रकार समोर आलेले असून त्याची माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानात प्रामुख्याने स्वस्त दरात इंजेक्शन, औषधे मिळवून देण्याचे आश्वासन देणे, कोरोनाग्रस्तांसाठी विविध संस्था, सरकारकडून ‘कोरोना सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि लसीकरणासाठी खोटय़ा नोंदणीच्या मदतीने नागरिकांच्या खिशातील पैसा आणि वैयक्तिक गोपनीय माहिती पळवली जात आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या परिस्थितीनुसार त्यांना कधी एखादे महागडे इंजेक्शन अथवा ऑक्सिजनची तातडीने गरज निर्माण होते. अशा वेळी मोठय़ा प्रमाणावर रुग्णाचे नातेवाईक सोशल मीडियाचा आधार घेऊन मदतीची हाक देतात. अशा ‘गरजवंत’ नागरिकांना ‘सायबर गुन्हेगार’ लक्ष्य करतात आणि त्यांना मदतीचे आश्वासन देऊन जाळ्यात अडकवतात. अशा अडचणीत असलेल्या नातेवाईकांना स्वस्त दरात अथवा कधी जादा पैशाची मागणी करत तातडीने इंजेक्शन अथवा ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचे आश्वासन दिले जाते व रुग्णाची तसेच नातेवाईकांची सर्व माहिती मागवली जाते.
दुसऱया प्रकारच्या हेराफेरीत तर लोक आपणहून उडी मारताना दिसत आहेत आणि त्याचे मुख्य कारण आहे ‘मोह’. ‘‘कोरोनाग्रस्तांसाठी एखाद्या संस्थेने अथवा सरकारने ‘सबसिडी’ चालू केली असून ती पन्नास हजार ते दोन लाखांपर्यंत आहे. ती तुम्हाला मिळू शकेल,’’ असे खोटे आश्वासन देऊन लोकांना जाळ्यात अडकवलेले असते. बरेचदा आधीच आर्थिक अडचणीत सापडले असल्याने किंवा ‘मिळतात पैसे तर का सोडा?’ अशा विचाराने बरेच लोक या सापळ्यात अडकतात. अशा लोकांकडून मग त्यांची किंवा घरातील ज्या कोणाला ‘कोरोना’ झालेला आहे, अशांची संपूर्ण माहिती मागवून गंडा घातला जातो.

तिसरा फसवणुकीचा प्रकार हा ताजा असून सरकारने सर्व वयोगटासाठी ‘मोफत लसीकरण’ जाहीर केल्यानंतर या प्रकाराने उच्छाद मांडला आहे. खोटय़ा वेबसाईट अथवा ऑप्लिकेशनची लिंक पाठवून लोकांना सरकारी लसीसाठी मोफत आणि त्वरित नोंदणीचे आमीष दाखवून जाळ्यात अडकवले जात आहे. अशा फसव्या लिंकवरून डाउनलोड करून घेतलेले ऑप्लिकेशन हे अधिकृत ऑप्लिकेशन नसून अत्यंत धोकादायक व्हायरस आहे हे लक्षात घ्या. असे धोकादायक ऑप्लिकेशन काही वेळातच तुमच्या मोबाईलचा ताबा घेते आणि तुमची महत्त्वाची माहिती, पासवर्ड अत्यंत बेमालूमपणे पळवून नेते.
वरच्या तिन्ही प्रकारांत लोकांना विविध सवलतींचे आमिष दाखवून एक फॉर्म भरण्यास सांगितले जाते. या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती… जसे की तुमचे नाव, पत्ता, जन्म तारीख, आधार अथवा पॅन कार्ड नंबरची नोंद करावी लागते. त्याचबरोबर तुमचे संपूर्ण बॅंक डिटेल्सदेखील नोंद करावे लागतात. कधी इंजेक्शन अथवा ऑक्सिजनसाठी तर कधी ‘सबसिडी’च्या मोहाने लोक ही सर्व माहिती जमा करतात. त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि तुमचे बॅंक डिटेल्स यांच्या मदतीने हे ‘सायबर गुन्हेगार’ तुमच्या बॅंक खात्यावर डल्ला मारतात. बरेचदा मोठय़ा प्रमाणावरती गोळा केलेली लोकांची ‘वैयक्तिक माहिती’ सोशल मार्केटमध्ये विक्रीदेखील केली जाते.

[email protected]