कोरोना काळात IVFच्या माध्यमातून आई-बाबा होताय, लक्षात ठेवा या टिप्स !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या काळात सध्या इतर कारणांकरिता वैद्यकीय उपचार घेत असाल तर ते अत्यंत काळजीपूर्वक घेण्याची गरज आहे. इनफर्टिलिटी ट्रिटमेंट किंवा आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून बाळाला जन्म देणाऱ्या पालकांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आयव्हीएफ उपचाराकरिता रुग्णलयात सतत फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे रुग्णालयात गेल्याने कोरोनाचा संसर्ग आपल्याला होईल की काय ? अशी भीतीही बऱ्याचशा जोडप्यांमध्ये बळावतेय. त्यामुळे आयव्हीएफ उपचार कोरोना काळात न करता पुढे ढकलावा, असेच पालकांना वाटते. पाहूया याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे काय आहे ?

कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या आईच्या गर्भातील बाळावर आणि प्रसुतीवेळी आईला एखादी समस्या निर्माण झाली आहे, तसेच गर्भपात झाल्याचे पुरावे नाहीत. गर्भवती स्त्रियांकरिता कोरोना लस सुरक्षित असल्यामुळे कोरोना काळात बाळाला जन्माला घालण्याचे नियोजन पुढे ढकलण्याची आवश्यकता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात आयव्हीएफ उपचार सुरू असलेल्या जोडप्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता

– आयव्हीएफ उपचार घेणाऱ्या जोडप्यांनी सकारात्मक आणि प्रकृती उत्तम राखणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी मानसिकदृष्ट्या शांत, स्थिर राहण्याकरिता ध्यानधारणा करावी.

– रुग्णालयात जाताना किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंड आणि नाक झाकले जाईल , अशा पद्धतीने मास्क लावावा.

– बाहेर गेल्यास हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत आणि चेहऱ्याला वारंवार हात लावू नये. सामाजिक अंतर पाळावे. विनाकारण घराबाहेर पडू नये.

– उपचार सुरू असताना डॉक्टरांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, आयव्हीएफ ट्रिटमेंट फॉलोअप घेत राहावा.

– रुग्णालयात गेल्यावर कमीतकमी लोकांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करा.

– पौष्टिक आणि समतोल आहार घ्या. रेडी टू इट आणि जंक फूड खाणे टाळा.

– योगासन करा. जेणेकरून स्वत:चे आरोग्य उत्तम कसे राहिल याकडे लक्ष द्या.

– उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुंसाचे विकार, किडनीचे विकार असलेल्यांनी आयव्हीएफ ट्रिटमेंटपूर्वी डॉक्टरांशी चर्चा करावी.

– आयव्हीएफ उपचाराकरिता स्पेशलाईज सेंटरची निवड करावी. जेणेकरून इतर रुग्णांच्या संपर्कात यावे लागणार नाही.

– आयव्हीएफ उपचार करण्यापूर्वी आई-वडील दोघांनीही स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी. जर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर आयव्हीेएफ उपचाराचा निर्णय घेऊ नका.  त्यानंतरच्या उपचाराकरिता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • आयव्हीएफ उपचार सुरू असताना कोरोनाची लक्षणे दिसल्यास रुग्णालयात जाणे टाळा. डॉक्टरांशी ऑनलाईन संपर्क करून पुढच्या उपचारांविषयी विचारून घ्या.