निर्बंध शिथिल केल्यानंतर पर्यटनस्थळे, बाजार गजबजले; केंद्र सरकार चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली. परंतु या ‘अनलॉक’चा नागरिक गैरफायदा घेऊ लागले आहेत. पर्यटनस्थळे आणि बाजार गर्दीने गजबजले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रस्त्यांवर ट्रफिक जॅम होऊ लागले आहे. ही परिस्थिती पाहून केंद्र सरकार चिंतेत पडले आहे. नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास निर्बंध पुन्हा लावले जाऊ शकतात, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी कोरोना परिस्थितीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हा इशारा दिला. ‘कोरोनाची दुसरी लाट अजूनही मर्यादित स्वरूपात कायम आहे. पर्यटनस्थळांवर मोठय़ा संख्येने गर्दी दिसू लागली आहे. असे करणे म्हणजे आजवरचे आपले प्रयत्न फोल घालवण्यासारखे आहे. कोरोना नियमावलीचे पालन करायला हवे,’ असे अग्रवाल यावेळी म्हणाले.

देशातील 73 जिह्यांमध्ये तिसऱया लाटेची दाट शक्यता

देशात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या 73 जिह्यांना आणि संबंधित राज्य सरकारांनाही आरोग्य मंत्रालयाने पत्र पाठवले आहे. या जिह्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. भार्गव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, तामीळनाडू, केरळ, ओडिशा, आसाम, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. तिसरी लाट कशी असेल त्याचे अंदाज बांधण्यापेक्षा आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंधांचे आणि नियमावलीचे पालन केले पाहिजे, असा सल्ला डॉ. भार्गव यांनी दिला आहे.

एका महिन्यात 7 लाख पर्यटक हिमाचलमध्ये

उत्तर हिंदुस्थानातील हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. एकटय़ा जून महिन्यात 6 ते 7 लाख पर्यटकांनी हिमाचल प्रदेशला भेट दिल्याचे सांगितले जाते. राज्यातील सिमला, मनाली, धर्मशाला, डलहौसी, नारपंडा आणि अन्य ठिकाणची सर्व हॉटेल्स आणि लॉजेस हाऊसफुल्ल आहेत. सोशल मीडियावर सिमला आणि कुलू-मनाली येथील व्हिडीयो पाहिले तर तिथे सोशल डिस्टन्सिंगचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.

पर्यटनस्थळांवरील गर्दी भयावह

‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पर्यटन स्थळांची सध्याची छायाचित्रे पाहिली तर परिस्थिती भयावह आहे असे म्हटले आहे. त्यांनी ती छायाचित्रे या पत्रकार परिषदेमध्येही सादर केली. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात हिमाचल प्रदेश सरकारला पत्र पाठवले आहे. कोरोना नियमावलीचे उल्लंघन होत असून त्यावर तातडीने कारवाई करावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.