कोरोनाच्या संकटातही शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱयांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे. त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे यास उशीर होत आहे. कोरोनाचे संकट हे अधिक आहे, परंतु शेतकऱयांच्या विकासासाठी जे काही शक्य आहे त्या कामांना प्राधान्य दिले जाईल. शेतकऱयांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.

अमरावती जिह्यातील येथील अचलपूर आणि चांदूरबाजार या तालुक्यातील 600 किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले.

शेतकऱयांना वीज, पाणी अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे शेतामध्ये पोहोचण्यासाठी पाणंद रस्ते महत्त्वाचे आहे. राज्याच्या विकासासाठी ज्याप्रमाणे महामार्ग आवश्यक आहेत त्याप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणंद रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता या पाणंद रस्त्यामध्ये आहे. या रस्त्याचे खडीकरण झाल्यास शेतकऱयांना शेताच्या बांधावर पोहोचणे सुलभ होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्याप्रमाणे आज पाणंद रस्त्याचा विषय मार्गी लागला आहे अशाच पद्धतीने एकजुटीने शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सरकार सोबत असावे. आज पाणंद रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.