कोरोनाच्या नैराश्यातून दोन वृद्धांची आत्महत्या, नागपुरातील दोन घटनांनी खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून याच काळात दोन वृद्धांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. नागपुरात अवघ्या काही तासांच्या अंतरावर दोन कोरोना बाधित वृद्धांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

पहिली घटना नागपूरमधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय म्हणजेच, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्येच घडली. 81 वर्षांच्या पुरुषोत्तम गजभिये नावाच्या वृद्ध व्यक्तीनं वॉर्डच्या बाथरूममध्ये काल संध्याकाळी गळफास लावून घेतला. पुरुषोत्तम गजभिये यांना कोरोनाचे निदान झाल्यांनतर 26 मार्च रोजीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळी बाथरूममध्ये गेलेले पुरुषोत्तम गजभिये बराच वेळ बाहेर न आल्याने रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱयाला शंका आली.

त्याने डॉक्टरांना ही बाब सांगितली त्यानंतर कोरोना बाधित वृद्धाच्या आत्महत्येची घटना समोर आली. 26 मार्च रोजी रुग्णालयात दाखल केल्यांनतर पुरूषोत्तम यांची अवस्था जाणून घेण्यासाठी कुटुंबिय रुग्णालयाकडे फिरकलेही नव्हते. त्यामुळे नैराश्यात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अजनीतही वृद्ध रुग्णाने जीवन संपवले

दुसरी घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत पंच्याशी प्लॉट परिसरात घडली. वसंतराव कुटे या 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं आज सकाळी राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. वसंतराव कुटे यांना 26 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतराव कुटे आधीच मुतखडय़ाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही कोरोना बाधित असल्याची माहिती मिळत आहे. आजारपणातील नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती अजनीचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे.