घरातच थांबेन…कोरोना रोखेन! रत्नागिरीकरांचा जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातच थांबेन…कोरोना रोखेन! आज धावणारा नाही तर थांबणारा जिंकणार आहे हे जाणूनच रत्नागिरकर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या रत्नागिरी जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

सोशल डिस्टन्स हाच कोरोना रोखण्याचा मुख्य उपाय असलेल्याचे ओळखून रत्नागिरीकरांनी आज रविवारी घरीच रहाणे पसंत केले आहे. जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 37 गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याने रेल्वेस्थानकांतही शुकशुकाट पसरला आहे. एस.टी.च्या गाड्या बंद असल्याने शहरांसह ग्रामीण भागातील रस्ते ओस पडले होते. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच अनेक दुकाने बंद होती. त्यात आज किराणा दुकानासह फळविक्रेते यांनीही दुकाने बंद ठेवली होती. रत्नागिरी एस.टी.स्टॅण्ड परिसरात मेडिकल सुरू ठेवण्यात आली होती. रत्नागिरी शहरातील बाजारपेठ, रामआळी, मारूती मंदिर, रेल्वेस्थानक, जयस्तंभ, माळनाका ही गजबजलेली ठिकाणी आज शांत होती.

वाहतूक पोलीस शहरातील रस्त्यावरून फिरणाऱ्यांची चौकशी करत होते. योग्य कारण न दिल्यास त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. दुचाकीस्वारांना हॅल्मेटची सक्ती लागू करण्यात आली होती. रत्नागिरीत कोरोनाबाधित एक रूग्ण सापडला असून 11 जणांचे जिल्हा रूग्णालयात विलगीकरण करण्यात आले असून 165 जणांचे त्यांच्या घरीच विलगीकरण करण्यात आले आहे.