
कोरोनाच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कटींग (सलून) दुकान चालक मालकांनी चांगली खबरदारी घेतली. या व्यवसायात थेट व्यक्ती सोबत संबंध येतो म्हणून हँड सॅनेटायझर वापरणे, प्रत्येक नवीन ग्राहकांना हात साफ करून मग कटींग करणे, मास्क वापरणे, साहित्य प्रत्येक वेळी सॅनेटाइझ करून वापरणे अशा प्रकारे संपूर्ण काळजी घेत असल्याचे नाभिक संघटनेकडून सांगण्यात आले. तसेच अनेक भागात स्वयं स्फूर्तीने काही दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अजिंठा सलूनमध्ये त्याचे उदाहरण पाहायला मिळाले. प्रत्येक नवीन ग्राहकांना हात साफ करून मग कटींग करणे, मास्क वापरणे, साहित्य प्रत्येक वेळी सॅनेटाइझ करून वापरणे, अशी खबरदारी घेत असल्याचे अजिंठा सर्वेसर्वा योगेश निकम यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/B98laUPpjRw/?igshid=3qjb23iyu5q1
प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. मास्क लावून ग्राहक आणि काम करणारे कारागीर प्रत्येकाची काळजी घेण्यात येत असल्याचे प्रतीक अँड हारीश सलूनचे प्रतीक पगारे यांनी सांगितले. यानंतर सरकारच्या सूचनांचे पालन करत सलून काही काळासाठी बंद ठेवण्यास सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर तुळजापूर येथे दुकाने 5 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 मार्च ते 24 मार्च पर्यंत सलून बंद असणार असून महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिली आहे. जिल्हा नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱयांच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना सलुन बंद ठेवणार असल्याच्या निर्णयाचे निवेदन पत्र सुपूर्द केले, नाभिक समाज संघटनेने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत स्वत:हून पुढाकार घेत हा निर्णय घेतला आहे.

नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, कर्मचारी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भालेकर, सरचिटणीस दाजी पवार, मराठवाडा विभागीय संघटक बाबासाहेब गायकवाड, राज्य संघटक किशोर राऊत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित, धाराशिव शहराध्यक्ष व्यंकट पवार, अमोल चौधरी, सचिन चौधरी यांच्यासह पदाधिकाऱयांनी बैठकीत हा निर्णय घेतला.
बीड जिल्ह्यातील केस कर्तनालय तीन दिवस बंद
कोरोना विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी नाभिक समाज बांधवांनी केस कर्तनालयाची दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मोठी सतर्कता पाळली जात आहे. आता जिल्ह्याभरातील केस कर्तनालाय सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय नाभिक समाजाने घेतला आहे, शनिवार, रविवार, सोमवार तीन दिवस जिल्हाभरातील दुकाने बंद राहणार आहेत.
























































