घरबसल्या वाचा ई-पुस्तके, वांद्र्याच्या नॅशनल लायब्ररीचा अनोखा उपक्रम

कोरोना व्हायरससारख्या आजाराला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील बरीच ग्रंथालये बंद आहेत. काही ग्रंथालयांमध्ये ऑनलाईन पुस्तके मागवण्याची सोय आहे, पण पुरेसा स्टाफ उपलब्ध नसल्याने इच्छुक वाचकांची गैरसोय होत आहे. या परिस्थितीवर मार्ग काढत घरी असलेल्या वाचकांच्या सोयीसाठी वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीने स्वत:कडील 20 ई-पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.

गुडीपाडव्याच्या मृहूर्तावर ही पुस्तके पीडीएफ स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध झाली आहेत. ही ई-पुस्तके संगणकांवर किंवा टॅबवर वाचता येतील अशी माहिती प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांनी दिली आहे. www.nationallibraryvandre.com या संकेतस्थळावर ही पुस्तके महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घेता येईल. ही पुस्तके ‘पुस्तक शोध’ लिंकवर क्लिक केल्यानंतर माहिती केंद्र उघडेल. यातील फक्त ‘ई-पुस्तके’ चेक बॉक्स सिलेक्ट करून शोधा बटणावर क्लिक केल्यास पुस्तकांची यादी दिसेल. त्यापैकी हवे ते पुस्तक निवडून (View E-Book) आयकॉनवर क्लिक केल्यास पीडीफ स्वरूपात उघडेल. विशेष म्हणजे लायब्ररीचे सभासद नसलेल्या वाचकांनाही या पुस्तक वाचनाचा लाभ घेता येईल.

नॅशनल लायब्ररीतर्फे या पुस्तकांची संख्या वाढविण्याचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच हा आकडा वाढून 100वर नेण्याचा मानस असल्याचं मनोगत महाडिक यांनी व्यक्त केलं आहे. या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बुध्द संप्रदाय आणि शिकवण, गेला तिच्या वंशा, पेशवाईतील कर्मयोगी, गुरुदेवाच्या गोष्टी, शतपावली, महात्मा फुले, श्री तुकाराम महाराजांचे चरित्र, कथा अकलेच्या कांद्याची, कर्मगती, ऐरणीवर अशी अनेक पुस्तके या माध्यमातून उपलब्ध आहेत. या पुस्तकांची आजची अवस्था प्रत्यक्ष हाताळण्याजोगी नाही. या पुस्तकांच्या प्रतीही क्वचितच उपलब्ध असतील. मात्र या ई-बुकच्या माध्यमातून नॅशनल लायब्ररीने दस्तऐवजीकरणाचे मोठे ध्येय गाठले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या