#corona ओडिशा कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर? राज्य सरकारने व्यक्त केली शंका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशा राज्यात शुक्रवारी 60 वर्षांच्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर ओडिशा राज्य सरकारने दिलेल्या निवेदनात ओडिशा हे राज्य कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शंका व्यक्त केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशा राज्य सरकारचे प्रवक्ते सुब्रतो बाग्ची यांनी याबाबत माहिती दिली आहे. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात ओडिशा सरकार फक्त परदेशाहून परत आलेल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करत होतं. जवळपास सर्व राज्यांमध्ये याप्रकारे काम सुरू होतं. मात्र आता ओडिशात कोरोना संक्रमण झालेले असे तीन रुग्ण आढळले आहेत जे कम्युनिटी ट्रान्समिशन मार्गाने कोरोनाबाधित झाले आहेत. म्हणजेच, कोरोना संशयित व्यक्ती किंवा प्रादुर्भाव झालेला प्रदेश यांच्या संपर्कात न येऊनही ते कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर ओडिशा हे राज्य असल्याची शंका भेडसावत आहे, असं बाग्ची यांचं म्हणणं आहे.

या तीन रुग्णांपैकी एकाच्या कुटुंबीयांना आणि चालकाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच तो किती जणांच्या संपर्कात आला, त्याची पडताळणी करण्यासाठीही 10 जणांचा चमू काम करत आहे.

कोरोनाचा तिसरा टप्पा म्हणजे काय?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना संक्रमणाचे चार टप्पे सांगितले आहेत. पहिल्या टप्प्यात परदेशाहून परतलेल्या नागरिकांनामधूनच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर येतं. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाबाधित व्यक्तिच्या थेट संपर्कात आलेली व्यक्ती कोरोनाबाधित होते. तर तिसऱ्या टप्प्याला कम्युनिटी ट्रान्समिशन म्हटलं जातं. या टप्प्यात कोरोनाबाधित व्यक्ती ना परदेशात जाऊन आलेली असते ना तिचा कोरोनाबाधिताशी थेट संपर्क असतो. पण, तरीही त्याला कोरोनाची बाधा झालेली असते. तर चौथा टप्पा हा अतिशय भीषण असून हा आजार महामारीचं रूप धारण करतो.