
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असून कोरोना चाचण्यांबरोबरच लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळेच आज माहीममध्ये एकही कोरोना रुग्ण सापडला नाही तर धारावीत 2 रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत कोरोना चाचण्यांसह 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू असल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही दुसऱया लाटेत सध्या कोरोना नियंत्रणात असून दिवसभरात आज 2 रुग्ण सापडले. मात्र, धारावीला लागून असलेल्या माहीममध्ये आज एकही रुग्ण सापडला नाही. याआधी 2 फेब्रुवारीला माहीममध्ये रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. सध्या माहीममध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारावरून 139 वर पोहोचली आहे तर मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण आणि बाजारपेठ असलेल्या दादरमध्ये आज 10 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या 160 वर पोहोचली आहे.
झोपडपट्टय़ा, दाट लोकवस्तीला कमी फटका
मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत झोपडपट्टी आणि दाट लोकवस्ती असलेल्या लोकांना जोरदार फटका बसला होता. कोरोनाची रुग्णसंख्या अशा परिसरांमध्ये जास्त होती, मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेचा झोपडपट्टय़ा आणि दाट लोकवस्तीवर जास्त परिणाम जाणवलेला नाही. पहिल्या लाटेत अशा परिसरांमध्ये लोकांमध्ये निर्माण झालेल्या अँटिबॉडीजमुळे दुसरी लाट फारशी जाणवली नाही, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.































































