राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.69 टक्क्यांवर; गेल्या 24 तासांत 7 हजार 883 रुग्ण कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात आतापर्यंत 14 लाख 94 हजार 809 जण कोरोनामुक्त झाले असून आता कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 89.69 टक्क्यांवर पोहचले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात एकूण 7 हजार 883 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहे. तर आज दिवसभरात एकूण 5 हजार 902 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 24 तासात एकूण 156 जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यू दर 2.62 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 88 लाख 37 हजार 133 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 16 लाख 66 हजार 668 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईत दिवसभरात 1,120 कोरोना रुग्ण; 1,824 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 1,120 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 1,824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 2 लाख 26 हजार 41 वर पोहोचली आहे. दिवसभरात 33 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत 33 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 186 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर आले आहे. तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 149 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 18 हजार 367 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 14 लाख 98 हजार 598 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 55 हजार 362 वर पोहोचली आहे.