
चीनमध्ये कोरोनाने पुन्हा कहर केला आहे. चीनमधून येणाऱ्या कोरोनासंदर्भातील वृत्ताने जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल, कोविड-19 वर्किंग ग्रुप एनटीजीआय डॉ एन के अरोरा, आयसीएमआरचे डीजी डॉ राजीव बहल आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. मंगळवारी केंद्राने राज्यांना कोविड पॉझिटिव्ह प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश दिले होते. यावरून देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आला आहे की नाही हे कळेल. आरोग्य तज्ज्ञ सध्या हिंदुस्थानला कोणताही धोका असल्याचे नाकारत असले तरी सर्वांनीच खबरदारी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत कोविड संदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांचीही उपस्थिती होती. राज्यमंत्री भारती पवार यांनी इतर देशांची काय स्थिती आहे, किती केसेस वाढत आहेत हे सांगितले. हिंदुस्थानातही कोणती पावलं उचलायची यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली आहे. चीनसह जगभरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरून आता पुन्हा काही निर्बंध लावले जाणार का हे या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.




























































