
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण आटोक्यात आली असून जुलैमध्ये गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एप्रिलमध्ये एकाच महिन्यात सर्वाधिक 2 लाख 33 हजार 910 रुग्णांची नोंद झाली. मात्र यानंतर मे महिन्यात 57 हजार 627 रुग्णांपर्यंत खाली आलेली महिन्याची रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने चांगलीच कमी होत गेली. जुलैमध्ये 12 हजार 563 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केला. 11 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.
यानंतर अवघ्या काही दिवसांतच झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत गेल्याने मुंबईत शेकडो ‘कोरोना हॉटस्पॉट’ निर्माण झाले. मात्र पालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजना आणि राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे कोरोना जानेवारी 2021 पर्यंत चांगलाच आटोक्यात आला. मात्र जानेवारीअखेरपासून कोरोना विषाणूचा झपाटय़ाने प्रसार होणारा नवा स्ट्रेन आणि निर्बंध शिथिलतेमुळे वाढलेली गर्दी अशा कारणांनी कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरली. जानेवारीअखेर 334 पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या थेट 11 हजारांवर गेल्याने मुंबईचे टेन्शन वाढले. मात्र पुन्हा एकदा पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे 350 ते 400 पर्यंत खाली आली आहे.
गेल्या सात महिन्यांत असे आढळले रुग्ण
जानेवारी – 15,533
फेब्रुवारी – 16,946
मार्च – 88,799
एप्रिल – 2,33,910
मे महिना – 57,627
जून महिना – 15,967
जुलै महिना – 12,563
49पर्यंत खाली आलेला ‘डबलिंग’ पंधराशेवर
कोरोनाच्या दुसऱया लाटेत फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. यामुळे जानेवारीअखेर 559 दिवसांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी फेब्रुवारीत 245 दिवस तर मार्चअखेर थेट 49 दिवसांपर्यंत खाली आला.
एप्रिलमध्येही रुग्णवाढ कायम राहिली. एप्रिलअखेर रुग्ण दुपटीचा कालावधी 85 दिवसांपर्यंतच वाढला. यानंतर मेपासून पुन्हा रुग्णसंख्या कमी होत गेल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी चांगलाच वाढून 433 दिवसांवर पोहोचला.
कोरोना स्थितीमधील सुधारणा कायम राहिल्याने जूनअखेर रुग्ण दुपटीचा कालावधी 716 दिवसांवर तर जुलैअखेर 1450 दिवसांवर म्हणजेच पंधराशे दिवसांवर गेला आहे. कोरोनाची तिसऱया लाटेचा धोका वर्तवला जात असताना मुंबईची स्थिती सुधारल्याने दिलासा मिळाला आहे.































































