पायी गावाकडे निघालेल्या मजुरांना उडवले, चौघांचा मृत्यू

death

कोरोनामुळे जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. हिंदुस्थानात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे जीवनावश्यक गोष्टी वगळता इतर सगळे उद्योगधंदे बंद करण्यात आले आहे. लोकांनी घरातच थांबावे, बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या आणि इतर राज्यातून कामासाठी आलेल्या मजुरांनी गावाला परतायला सुरुवात केली आहे. गुजरातमधील 7 जण पायी आपल्या गावाकडे परत निघाले होते. या मजुरांना भरधाव टेंपोने उडवल्याने त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

पायी गावी परतण्याचा मार्ग या मजुरांसाठी जीवघेणा ठरला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारजवळील मांडवी येथे त्यांना टेंपोने उडवले असून चार जण यात दगावले आहेत. त्यांच्यासोबतचे 3 जण हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे राज्यांमधल्याच नाही तर जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. यामुळे या मजुरांना गुजरातमध्ये जाण्याआधी अडवण्यात आलं आणि त्यांना परत जाण्यास सांगितलं. यामुळे निराश झालेले हे मजूर वसईच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्यांना आयशर कंपनीच्या टेंपोने धडक दिली. यातील दोघांची ओळख पटली असून कल्पेश (32) आणिमयांक (34) अशी दोघांची नावे असल्याचं कळतं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या