एटीकेटी परीक्षेचा सावळागोंधळ, लिंक मिळाली नाही; विद्यार्थ्यांची परीक्षाच रद्द

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका एटीकेटीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना बसला आहे. ऑनलाईन परीक्षा सुरु झाल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना लिंक न मिळाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या एटीकेटीच्या ऑनलाईन परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाकडून एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीवर परीक्षेसाठी लिंक पाठवण्याची जबाबदारी होती. परंतु सकाळी 10 वाजता सुरू होणाऱया लाईफ सायन्स परीक्षेची लिंक अनेक विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मिळालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. ज्या विद्यार्थ्यांना लिंक मिळाली त्यांचीच परीक्षा घेण्यात आली आहे.

परीक्षा रद्द झालेली नाही
एटीकेटीच्या कोणत्याही परीक्षा रद्द झाल्या नाहीत, असे किद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक विनोद पाटील यांनी स्पष्ट केले. काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक मिळू शकली नाही. ज्यांना लिंक मिळाली त्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लिंक न मिळालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱया टप्प्यात परीक्षा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या