मालवणात ‘जनता कर्फ्यू’ ला लोकांचा चांगला प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव आणि संक्रमणाची पसरत चाललेली साखळी तोडण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मालवणमध्येही ‘जनता कर्फ्यू’ लोकांनी यशस्वी केला. जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकजण रविवारी घरीच थांबला होता. मालवण शहरातील बाजारपेठाही पूर्णपणे बंद होत्या.तसेच रस्त्यावरही सर्वत्र शुकशुकाट होता.

पोलीस प्रशासनाच्या वतीने काही महत्वाच्या ठिकाणी थांबून तसेच फिरत्या पथकाद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनीही शहरात फिरून पाहणी केली. सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र होते. मालवण शहरातील भरड नाका, पिंपळपार ही कायम गजबजलेली प्रमुख ठिकाणे तसेच कायम वर्दळ असणारे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. बाजारपेठेतील छोटी मोठी सर्वच दुकाने, हॉटेल बंद होती. रविवारी गजबजणारा मासळी बाजारही पूर्णपणे बंद होता. ग्रामीण भागातही जनतेने आपले घराबाहेरील सर्व व्यवहार बंद ठेवून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रत्येकजण यात सहभागी झाला होता.