जनता ‘कर्फ्यु’त काय करतेय? रविवारसाठीच्या स्पेशल प्लॅनची, स्पेशल बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी देशभरात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने शनिवारपासूनच देश लॉकडाऊन केला. या लॉकडाऊनमुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.महाराष्ट्रातील जनता या लॉकडाऊनमध्ये काय करणार आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दिवसभरात काय करणार आहात, काय केलं हे तुम्हीही आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आम्ही आपल्याला बातमीच्या खालच्या बाजूस प्रतिक्रिया नोंदवण्यासाठीची जागा उपलब्ध करून दिली आहे.

भाकरी बनवायला शिकणार आहे – धनश्री काडगांवकर, अभिनेत्री

 सध्या कोरोनामुळे कुठेही बाहेर पडता येत नाहीये. तेव्हा तुम्ही घरात राहून स्वतःला वेळ देऊ शकता. स्वतःची काळजी घेऊ शकता. मीही गेल्या कित्येक दिवसांपासून पार्लरमध्ये जाऊ शकले नव्हते. आत्ताही पार्लरसह सर्व काही बंद असल्याने घरात थांबणं भाग आहे. पण, मीही स्वतःकडे नीट लक्ष देत आहे. क्लिन अप, मेनिक्युअर, पेडिक्युअर अशा गोष्टी ज्या मी पार्लरमध्ये जाऊन करणार होते, त्या सगळ्या मी घरीच करत आहे. तसं तुम्हीही करू शकता. यासोबत मी अनेक चांगले सिनेमे, वेबसीरीजही पाहणार आहे. अभिनेत्री असल्यामुळे ही माझ्यासाठी नवीन काहीतरी शिकायची संधी आहे, असं मला वाटतं. मी सध्या स्वयंपाकघरात नवीन पदार्थही बनवायला शिकत आहे. मला पोळ्या उत्तम येतात, पण भाकरी शिकले नव्हते. या निमित्ताने मी भाकरीही करून पाहिली. तुम्हीही असं काही करू शकता. शिवाय मी आता ज्या नातेवाईकांना, मित्रांना भेटू शकत नाही, त्यांना फोन किंवा मेसेज करून त्यांची खुशाली विचारणार आहे.

वेळ मिळत नाही म्हणून आपण अनेक गोष्टी पुढे ढकलतो. त्यामुळे आता वेळ मिळाला आहे तर, स्वतःचं कोडकौतुक पुरवायचं राहून गेलं असेल ते करा. या सोबत तुमच्या घराची साफसफाई, घर आवरणं, कपाट आवरणं, कपडे धुणं इत्यादी कामंही तुम्ही घरबसल्या करू शकता. शक्यतो कारणाशिवाय घराबाहेर पडू नका. स्वतःची आणि कुटुंबीयांचीही काळजी घ्या. घरकामासाठी येणाऱ्या महिलांना हात धुवून मगच कामाला लागण्याची विनंती करा.

ओळखीच्यांना फोन करून विचारणार आहे की, घरी आहात ना ? – वैभव जोशी, गीतकार

7ee5ace696b1a689296cd23416b7cd12

मागील दहा दिवसापासून मी घरीच आहे. गेल्या तीन-चार वर्षात माझे जे जे करायचे राहून गेले होते. स्वतःसाठीच लेखन म्हणा, कारण सिनेमासाठी लिहिताना स्वतःचे लिखाण, पुस्तकाचे काम मागे पडले होते. ते करणार आहे. वाचायचे राहून गेलेली पुस्तक, बघायचे राहून गेले ओल्ड सिनेमा पाहणार आहे. यासोबतच ओळखीतल्या जास्तीत जास्त लोकांना फोन करून ते घरी आहे की नाही? विचारणार आहे. कोरोना व्हायरस हे संपूर्ण जगावरचं मोठं संकट आहे. आपल्याला खरं तर कोणाला सांगायची गरज नाही की, घरात राहणे गरजेचे आहे. संपर्क टाळणे गरजेचे आहे. आपल्या संस्कारांमध्येच स्वच्छता ठेवणे सांगितले आहे. गेल्या काही वर्षात त्याचा विसर पडला असेल तर त्याची उजळणी करणे गरजेचे आहे. आपल्याला लहानपणापासूनच बाहेरून घरात आल्यावर हात पाय धुण्याचे सांगितले आहे, जेवणाआधी हात धुण्याचे सांगितले आहे. मला वाटते की प्रत्येकाने मनात त्याची उजळणी केली की आपल्याला पुन्हा आपल्या रोजच्या आचरणात या सवयी आणता येईल. हे फक्त रविवार पुरतेच मर्यादित नाही, तर पुढील अनेक दिवस आपल्याला ही काळजी घ्यावी लागणार आहे. पुढील आणखीन एक ते दोन महिने आपल्याला या संकटाशी लढा द्यायचा आहे यासाठी आपण सर्वांनी मानसिक तयारी ही करायला हवी.

वाचन, सिनेमा आणि कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवणार- आदिनाथ कोठारे, अभिनेता आणि दिग्दर्शक

adinath-kothare-mustach

कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. मी त्या संधीचा पूरेपूर वापर करणार आहे. या दिवसात मी वाचन, उत्तम सिनेमे अथवा वेबसीरीज पाहणार आहे. या संकटामुळे सगळं जग आज दुःखात असलं तरी आपण त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनेही पाहिलं पाहिजे. कारण, या निमित्ताने आपण सगळे जात-धर्म ते अगदी देशांमधले भेद विसरून एकत्र लढत आहोत. या संकटाने माणूस निसर्गासमोर किती तुच्छ आहे, याची जाणीव करून दिली आहे. त्यामुळे या निमित्ताने आपण मिळालेल्या वेळात आपल्यापैकी प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करायला हवं असं मला वाटतं. आपल्या हातून झालेल्या चुका, घडलेल्या गोष्टी यांचा एकदा पुनर्विचार करण्यासाठी आपल्याला हा वेळ मिळाला आहे, असं आपण मानायला हवं. जर आपण स्वतःची आणि इतरांचीही योग्य ती काळजी घेतली तर मी आशा करतो की हे संकट जेव्हा निघून जाईल तेव्हा आपल्यातली बरीचशी निगेटिव्हिटी त्याच्यासोबत निघून जावी.

घरी थांबून नियमित रूटिन सुरू ठेवणार- मुक्ता बर्वे, अभिनेत्री

mukta-barve-photographer

मी कोरोनासाठी खबरदारी म्हणून गेले दहा दिवस घरीच थांबले आहे. घरी थांबूनही मी माझं नियमित रुटिन सुरू ठेवलं आहे. पण, या निमित्ताने मला जाणवलेली गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, त्यांपैकी अनेकांनी त्या प्राण्यांना कोरोनाच्या भीतीने एका रात्रीत रस्त्यावर सोडून दिलं आहे. रस्त्यावर अशा प्रकारे फिरण्याची सवय नसलेले आणि असं सोडून दिल्याने भुकलेले हे प्राणी भरकटत आहेत. त्यांच्या भरकटण्यामुळे रस्त्यांवर अपघातही होत आहेत. मला कमाल वाटते की, ज्या प्राण्यांना आपण इतक्या प्रेमाने घरी आणतो आणि सांभाळतो, त्यांना असं एका रात्रीत कसं काय सोडून देऊ शकतो. तेव्हा माझं असं आवाहन आहे की, प्राण्यांमुळे कोरोना पसरतो या गैरसमजातून उगाच प्राणी सोडून देऊ नका.

स्वयंपाक शिकणार, मुलांसोबत खेळणार- सयाजी शिंदे, अभिनेता

sayaji-shinde

बराच काळ कामानिमित्त बाहेर असल्याने आता घरी थांबण्याची संधी मिळाली याचा फायदा घेऊन मी उद्या घरात स्वयंपाकाला मदत करणार आहे आणि शिकणारही आहे. मित्रांशी फोनवर संवाद साधणार आहे. तसेच मुलांशी खेळणार आहे. कॅरम खेळायचा विचार होता, मात्र सध्या तो तुटल्याने पत्ते आणि इतर खेळ खेळणार आहे. सकाळी उठून योगा आणि व्यायाम करणार. आपण सुदृढ राहिलो तर कोरोनाचा सामना करू शकतो. लोकांनी प्रशासनाचे आवाहन गांभीर्याने घ्यायला हवे, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपल्याकडे आधीच लोकसंख्या जास्त असल्याने आणि सोयीसुविधा कमी असल्याने होत्याचे नव्हते होऊ शकते. म्हणून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करा, घरात थांबा.

घरी राहूनही जग फिरू शकतो – राहत इंदौरी, प्रसिद्ध शायर आणि गीतकार

rahati-indori

सरकारने हा खूप चांगला निर्णय घेतलेला. या निर्णयामुळे कोरोना व्हायरसशी लढा देण्यास आपली खूप मदत होणार आहे. मी आज आणि पुढील काही दिवस घरीच राहणार आहे. खूप सारी पुस्तकं आहेत जी मला वाचायची आहेत, ती वाचेन. मित्रांशी फोनवर बोलेन. घरातल्या लहान मुलांसोबत खेळेन, आपण घरी राहूनही जग फिरू शकतो. यासाठी गरजेचे नाही आहे की तुम्ही घराबाहेर पडलेच पाहिजे. आपल्या देशावरती ओढवलेल्या या संकटाला पाहता मी लोकांना घरी राहून स्वतःची व इतरांची मदत करण्याचे आवाहन करतो.

व्यायाम करून दिवसाची सुरूवात – जुई गडकरी, अभिनेत्री

व्यायाम करून उद्या मी दिवसाची सुरूवात करणार आहे. नेहमीच दिवसाची सुरूवात अशा प्रकारे करते.  माझ्या घरी सात मांजरी आहे, त्यांच्यासोबत मी वेळ घालवणार आहे. घरातल्या झाडांची निगा मी उद्या राखेन. तसेच घरातील जी छोटीमोठी कामे आहेत साफसफाई, सगळ्या वस्तू जागेवर लावणे अशी कामे करणार आहे. पुस्तकांचे खणही साफ करणार आहे. लोकांनी हा जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहनही मी करत आहे.

मुलांसोबत वेळ घालवेन – अनिकेत आमटे, समाजसेवक, लोकबिरादरी प्रकल्प

aniket-amte

 

सध्या हेमालकसा प्रकल्प बाहेरच्या लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. तसेच प्रकल्पातील लोकांनाही बाहेर जाण्यास बंद केले आहे. संपूर्ण प्रकल्पातील लोक विलग केले आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. प्रकल्पात काम करत असताना मुलांना नेहमीच वेळ देता येत नाही. मी रविवारी माझ्या मुलांना पूर्ण वेळ देणार आहे. त्यांच्यासोबत खेळणार आहे, वाचन करणार आहे. इंटरनेट असल्यामुळे मुलांसोबत मी छान छान ऍनिमेशन चित्रपट पाहीन. लोकांनीही या दिवशी बाहेर पडू नये असे आवाहनही मी यावेळी करतो.

चांगली पुस्तकं वाचणार, सिनेमे बघणार, कविता शेअर करणार- संदीप खरे, कवी

sandeep-khare

मी स्वतःलाच होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच मी न्युझीलँड मधून परत आलो आणि येताना सिंगापूरहून आलो. त्याच्यामुळे मी स्वतःलाच होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. त्यामुळे आजच्या जनता कर्फ्यू निमित्त मी तेच करणार आहे, जे मी गेले काही दिवस करत आहे. थोडक्यात सांगायचं तर मी घरीच राहणार आहे. घरी राहून ही अतिशय आनंदाची गोष्ट बनवण्याचा प्रयत्न करतोय. किंबहुना प्रयत्न करावे लागत नाही आहे. आपल्यामध्ये ज्या अनेक दडलेल्या किंवा राहिलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी यानिमित्ताने सापडतायत. उदाहरणार्थ मी माझ्या पुस्तकांचे कपाट पूर्णपणे पसरून बसलेला आहे. सिनेमे बघतो आहे, गाणे ऐकतो आहे. काही कविता शेअर करायचा राहिल्या आहेत त्या शेअर करतोय. हे सर्व करायची एक संधी मला मिळाली. पुढील काही दिवस मी हेच करणार आहे. माझं सर्वांना आवाहन आहे, हिंदुस्थानात झपाट्याने वाढत असलेल्या या रोगाला सर्वांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. कोणीही ही लाईटली घेऊ नये. हा अतिशय गंभीर प्रसंग आहे. याला घाबरून जाऊ नका मात्र काळजी घ्या. घरी राहून जितके शक्य होईल तितकं जनसंपर्क टाळण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी आणि इतरांसाठी योग्य ती काळजी घ्या. आपण सर्वांनी सोबत येऊन या कोरोना व्हायरसला लढा देऊ.

पुस्तकं, वेबसिरीज, मुलीसोबत कॉमिक्स वाचन आणि बरंच काही- गजेंद्र देवडा, विभाग प्रमुख, जनसंपर्क आणि पत्रकारिता विभाग, साठ्ये महाविद्यालय

deoda

 अघोषित असा कर्फ्यू तर होताच मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा कर्फ्यूची घोषणाच केली आहे. सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत पूर्णवेळ घराच्या बाहेरच न पडणे हा एक आगळा वेगळा अनुभव असेल हे नक्की. मग घरी काय काय करता येईल याची जय्यत तयारी केली आहे. खूप दिवसांपासून रामायण,महाभारत मधल्या अमर चित्रकथा चे कॉमिक्स मुलीला वाचून दाखवायचे होते तो एक उपक्रम उद्या करणार आहे. बऱ्याचशा वेबसिरीज बघायच्या राहून गेले होत्या, त्यातली “समांतर” उद्या पूर्ण होईल अशी आशा आहे. गिरीश कुबेर लिखित टाटायन हे पुस्तक आजच हातात घेतले आहे,ते पण उद्या पूर्ण करण्याचा निर्धार आहे.हां… थोडा वेळ बातम्या पण बघणार असा एकूण बेत ठरला आहे.