
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आतापर्यंत सापडलेला नाही, पण तरीही कोरोनाच्या भीतीमुळे धास्तावलेल्या मुंबईकरांनी एन 95 मास्क विकत घेण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. परिणामी एन 95 मास्कची जादा दराने विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन व राज्याच्या वजन-मापे विभागाने मेडिकल स्टोअर्स विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने मास्कच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. एन 95 मास्कचे घाऊक पुरवठादार व मास्क आयात करणाऱया कंपन्यांसोबत बैठक घेतली तेव्हा किमान एक लाख एन 95 मास्कचा साठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. वास्तविक प्रत्येकाने एन 95 किंवा मेडिकल मास्क वापरण्याची गरज नाही. कोरोनाचा संसर्ग झालेला संशयित व तपासणी करणारे डॉक्टर यांच्यासाठी एन 95 मास्क अतिशय आवश्यक आहे. रस्त्यातून फिरताना एन 95 किंवा मेडिकल मास्क वापरण्याची गरज नाही. तोंडावर साधा रुमाल बांधला किंवा साधा कापडी मास्क वापरला तरी पुरेसा आहे असे राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व नियंत्रण प्राधिकारी विकास बियाणी यांनी सांगितले.
साध्या मास्कसाठी डॉक्टरी चिठ्ठी नको!
प्रत्येक मास्कवर किमतीचा (एमआरपी) उल्लेख असतो, पण त्यापेक्षा अधिक दराने विक्री केल्याचे आढळून आल्यास औषध विक्रेत्यांवर राज्य सरकार कारवाई करणार आहे. राज्याच्या वजन व मापे विभागाचे अधिकारी औषध विक्रेत्यांवर लक्ष ठेवून आहेत. काळाबाजार टाळण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय एन 95 मास्कची विक्री करू नये असे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. मेडिकल मास्कव्यतिरिक्त साध्या मास्कच्या खरेदीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही.


























































