
कोरोना महासाथीच्या काळात नेहमीच्या लांबपल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ा स्पेशल दर्जा देऊन ‘स्पेशल फेअर’मध्ये चालविण्यात येत होत्या. आता मात्र रेल्वे वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार आणि त्यांच्या क्रमांकांनुसार चालवण्यात येणार असून त्यांचे तिकीट दरही पूर्ववत करण्यात येणार आहेत. तब्बल 20 महिन्यांनंतर रेल्वे पूर्वीप्रमाणे धावणार असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये 1700हून अधिक ट्रेन पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. मात्र रेल्वे प्रवास करताना कोविड-19चे निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू असणार आहेत. रेल्वेच्या परिपत्रकानुसार आधीच आगाऊ आरक्षित करण्यात आलेल्या तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल केले जाणार नाही आणि रिफंडही प्रवाशांना देण्यात येणार नाही. कोरोनाकाळात विशेष ट्रेन म्हणून विशेष तिकीट दर आकारण्यात आले होते. या रेल्वेचे तिकीट दर पूर्वीप्रमाणे असणार आहेत.


























































