
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय सरसकट पास करण्याविषयी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील कलम 16 नुसार ‘वर्गोन्नती’ असा शेरा देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील अभ्यासाचे एकूण 100 गुणांपैकी मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना श्रेणी प्रदान करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला, मात्र या निर्णयाविषयीच्या लेखी सूचना शाळांना मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे असा प्रश्न शाळांसमोर होता. पण आता एमएससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले असून या सूचना केवळ राज्य शिक्षण मंडळाशी संलग्नित शाळांसाठी लागू असल्याचेही म्हटले आहे.
अभ्यासात मागे राहणाऱया विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण
कोरोना काळात अभ्यासात मागे राहिलेल्या तसेच सध्याच्या वर्गात क-2 पेक्षा कमी श्रेणी मिळविणाऱया विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वर्षात एमएससीईआरटीच्या वतीने कृती कार्यक्रम विकसित करण्यात येणार आहे. तसेच विशेष प्रशिक्षणाचे आयोजनही केले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी शाळांनी विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घ्यावी अशा सूचनाही एमएससीईआरटीने दिल्या आहेत.
आकारित मूल्यमापन – वर्षभरातील विद्यार्थ्याच्या वागणुकीविषयी नोंदी ठेवणे, दैनंदिन निरीक्षण पाहणे, तोंडी काम, उपक्रमातील सहभाग यानुसार होणारे मूल्यमापन.
संकलित मूल्यमापन – प्रथम व द्वितीय सत्राच्या शेवटी होणाऱया लेखी परीक्षा. (यंदा कोरोनामुळे त्या ऑनलाइन पार पडल्या.)
- ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलित मूल्यमापन पूर्ण झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल प्रचलित पद्धतीनुसार 100 गुणांपैकी जाहीर केला जाणार.
- ज्या विद्यार्थ्यांचे केवळ आकारिक मूल्यमापन झाले आहे अशा विद्यार्थ्याची संपादणूक पाहून त्याचे रूपांतर 100 गुणांमध्ये करून विद्यार्थ्याची श्रेणी ठरवली जाणार.
- ज्या विद्यार्थ्यांचे आकारिक, संकलित यांपैकी कोणतेचे मूल्यमापन झालेले नाही अशा विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यातील कलम 16 नुसार पुढील वर्गात वर्गोन्नती मिळणार.
अशी मिळणार श्रेणी, टक्केवारी श्रेणी
- 81 ते 100 अ
- 61 ते 80 ब
- 41 ते 60 क
- 0 ते 40 ड


























































