भांडुपमध्ये दुपारी 12 नंतर दुकाने बंद! दररोजच्या रुग्णवाढीने धोका वाढला

मुंबईत वेगाने रुग्णवाढ होत असताना पालिकेच्या ‘एस’ प्रभाग भांडुपमध्येही झपाटय़ाने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या प्रभागात दुपारी 12 वाजल्यानंतर फक्त मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील असा महत्त्वपूर्ण निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने परिपत्रक जारी केले आहे. हे नियम मोडणाऱयांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबई, राज्यासह संपूर्ण देशभरात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र नागरिक अजूनही नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी आहे, मात्र तरीही बाजारांमध्ये गर्दी दिसून येत आहे. यावर राज्य सरकारसह महापौर किशोरी पेडणेकर यांनीही निर्बंध अधिक कठोर करण्याची गरज व्यक्त केली आहे.

एस प्रभागाचे सहाय्यक आयुक्त विभास आचरेकर यांनी या प्रभागातील बाजारांच्या वेळेचे नियोजन केले आहे. यात औषधांची दुकाने वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी 12 वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेट्रो, डी मार्ट असे डिपार्टमेंट स्टोअर्सही या वेळेनंतर बंद करण्याचे निर्देश आचरेकर यांनी दिले आहेत.

फक्त हॉटेलांना होम डिलिव्हरीला परवानगी

एस विभागात नियम कठोर करण्यात आले असले तरी हॉटेल्सना पूर्वीप्रमाणे होम डिलिव्हरीची परवानगी आहे. यापूर्वी घाटकोपर एन विभागाच्या हद्दीत सकाळी 11 ते 4 या वेळेत सर्व बाजार बंद ठेवण्यात येत होता. बाजारांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. एस प्रभागात आतापर्यंत 16 हजार 150 रुग्ण आढळले आहेत, तर सध्या 3 हजार 678 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांचा आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या