‘या’ देशातील जनतेने लॉक डाऊनचा आदेश झुगारला; प्रशासन हतबल

2540

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक देशांनी लॉक डाऊनची घोषणा केली आहे. लॉक डाऊनची अंमलबजावणी करणे प्रशासनासाठी आव्हानात्मक असते. तसेच जनता कसा प्रतिसाद देते, त्यावर प्रशासनाला निर्णय घ्यावे लागतात. ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तीन आठवड्यांच्या लॉक डाऊनची घोषणा केली. मात्र, जनता लॉक डाऊनला जुमानत नसल्याचे चित्र आहे. ब्रिटनच्या अनेक शहरात मेट्रो ट्रेनसह, बसमध्येही गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत आहे. आता ही गर्दी थोपवायची कशी आणि लॉक डाऊनची अंमलबजावणी कशी करायची हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. या परिस्थितीला जॉन्सनच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

ब्रिटनमध्ये लॉक डाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर रेल्वे, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठीच या सेवांचा वापर करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले. मात्र, तरीही मेट्रो आणि रेल्वेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने लॉक डाऊनचे आदेश असताना गर्दीला कसे आवरायचे अशी समस्या निर्माण झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉक डाऊनची घोषणा करत काही उपाययोजना केल्या आहेत. तसेच जनतेने लॉक डाऊनचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. तरीही नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने जॉन्सन यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. जॉन्सन यांनी जनतेला केलेल्या आवाहनात जनतेने काय करावे आणि काय करू नये, याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. नेमक्या कोणत्या गोष्टींवर बंदी आहे, असा सवाल अनेक नागरिक पोलिसांना करत आहेत. जनतेने घरहाबाहेर पडू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे वाहतूक मंत्री गेंट शाप्पे यांनी सांगितले.

जॉन्सन यांची लॉक डाऊनची घोषणा आणि या काळात कोणत्या नियमांचे पालन करावे, याबाबतच्या सूचना जनतेपर्यंत पोहचवण्यात येत आहेत. आगामी काही दिवस पोलिसांसाठी आव्हानात्मक असल्याचे गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सांगितले. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने प्रशासन आणि पोलीस हतबल झाल्याचे दिसून येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी घरातच राहवे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या