
सामना प्रतिनिधी । पुणे
पुणे महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीबाहेर उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची पोलिसांनी काही काळासाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे महापालिका परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दादागिरी करीत नगरसेवकांना ताब्यात घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या इमारतीच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला.
पालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम, नंदा लोणकर, योगेश ससाणे यांच्यासह महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह काही कार्यकर्ते नव्या इमारतीच्या बाहेर व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीने उभे होते. परंतु, अचानक पाऊस आला आणि पोलिसांनी ऐनवेळी त्यांची जागा बदलली. हे नगरसेवक आणि कार्यकर्ते नव्या जागी थांबले असता पोलिसांनी त्यांना गाडीत भरून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात नेले आणि काही वेळाने सोडून दिले.
याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, या कार्यक्रमासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनाही आमंत्रण दिले होते. परंतु, काही कारणास्तव शरद पवार येऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही जमलो होतो. मात्र, पोलिसांनी आम्हाला इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ थांबून दिले नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही. आम्हाला फक्त स्वागत करायचे आहे, असे पोलिसांना सांगितले. मात्र, आमच्या काही कार्यकत्र्यांना पोलिसांनी दादागिरी करून उचलून गाडीत टाकले आणि शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेले. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
पुणेरी पगडी अन् शरद पवार यांची गैरहजेरी
पुण्यात हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता समारंभात पुणेरी पगडीऐवजी पुâले पगडी वापरण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. त्यावर चर्चा झाल्यानंतर आपला कोणाचेही मन दुखावण्याचा हेतू, उद्देश नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर पालिकेच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात उपराष्ट्रपतीसह सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुणेरी पगडी देऊन स्वागत करण्यात येणार होते. पुणेरी पगडी स्वीकारली तरी अडचण आणि नाही स्वीकारली तरी अडचण होती. त्यामुळे या पेचात सापडलेल्या पवारांनी या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.
























































