
निरोगी शरीराकरिता श्वासोच्छवास सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. याकरिता फुफ्फुसांचे स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा हिवाळ्यात सर्दी, पडशासारखे विकार होण्याची दाट शक्यता असते. हल्ली कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे फुफ्फुसात कफ साचतो. कफामुळे कारोनाचा प्रादुर्भाव फुफ्फुसांवरच आधी होतो. यामुळे ब्रॉंकायटिस, क्षयरोग, निमोनिया यासारख्या आजारांचा धोका वाढतो शिवाय कफामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, घसा खवखवणे, घसादुखी यासारखे विकार बळावतात. छाती आणि फुफ्फुसात जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी काही जुने घरगुती उपचारही करता येऊ शकतात. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी हे घरगुती उपचार केल्याने कोणतेही साईड इफेक्ट न होता कफविकारापासून सुटका होऊ शकते.
निलगिरी तेल
जुना खोकला किंवा छाती आणि फुफ्फुसात जमा झालेला बऱ्याच दिवसांपासून साचलेला कफ कमी करण्यासाठी निलगिरी अत्यंत गुणकारी आहे. यासाठी थोडेसे निलगिरी तेल छातीला लावा. तसेच निलगिरीचे काही थेंब रुमालावर टाकून या तेलाचा दीर्घ श्वास घेतल्याने सर्दी आणि कफ कमी व्हायला मदत होते किंवा गरम पाण्यात निलगिरीचे काही थेंब घालून या पाण्याने अंघोळही करू शकता.
कच्ची (ओली) हळद
कच्च्या किंवा ओल्या हळदीच्या रसाचे काही थेंब घशात घाला. त्यानंतर काहीही खाऊ किंवा पिऊ नका किंवा या हळदीचा रस कोमट पाण्यात घालून गुळण्याही करू शकता. हळदीत करक्युमिन नावाचा घटक असतो. यामुळे कफ काढून टाकायला मदत होते. हळदीत अँण्टीबॅक्टेरियल आणि अँण्टीव्हायरल हे गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला बरा होण्यासाठीही मदत होते.
गरम द्रवपदार्थ
फुफ्फुसात कफ जमा झाल्यास जास्तीत गरम द्रवपदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे कफ पातळ व्हायला मदत होते शिवाय गरम पातळ पदार्थांमुळे छाती, नाक आणि फुफ्फुसात जमा झालेला कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते. याकरिता चिकन सूप, गरम पाणी, ग्रीन टी, भाज्यांचे गरम सूप्स यांचे सेवन करावे.
गरम पाण्याची वाफ घेणे
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळवा. त्यानंतर एक कापड किंवा चादर डोक्यावरून घेऊन वाफ घ्या. आराम मिळेपर्यंत वाफ घेऊ शकता. ठराविक वाफ घ्यायला हवी असे काही नाही. जेव्हा खूप गरम झाल्यासारखे वाटेल तेव्हा डोक्यावर घेतलेले कापड बाजूला काढा.
गरम पाण्याच्या गुळण्या
छाती आणि नाकात जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी हा उपचार सर्वोत्तम मानला जातो. छातीत जमा झालेला कफ काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा. यामुळे घसा खवखवणे, खोकला आणि ताप या लक्षणांपासून आराम मिळू शकतो.
गरम पाणी आणि मध
खोकला, कफ यापासून आराम मिळण्यासाठी गरम पाण्यात मध मिसळून पिणे. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. गरम पाण्यात आल्याचा रस घालूनही पिऊ शकता.


























































