
टीम इंडियाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा सध्या ससेक्स क्रिकेट क्लबकडून कौंटी क्रिकेट खेळत आहे. आता ससेक्स आणि मिडलसेक्स क्रिकेट क्लबदरम्यान लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर सामना सुरू आहे. या सामन्यात पुजाराने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने बुधवारी (20 जुलै) ससेक्ससाठी हंगामातील तिसरे द्विशतक झळकावले. गेल्या 108 वर्षांमध्ये ससेक्ससाठी अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर ‘क्रिकेटची पंढरी’ अशी ओळख असणाऱया लॉर्ड्सवर द्विशतक झळकावणारा तो पहिला हिंदुस्थानी ठरला आहे.
हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एजबस्टन कसोटी सामन्यासाठी तो हिंदुस्थानी संघातून खळला होता. कसोटी सामना संपल्यानंतर तो पुन्हा ससेक्समध्ये परत गेला. पुन्हा ससेक्समध्ये दाखल झाल्यानंतर त्याने पहिल्या सामन्यात केवळ 46 धावा केल्या होत्या. मात्र मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्यात पुजाराने शानदार खेळ केला. त्याने 403 चेंडूमध्ये 231 धावांची खेळी केली. या लढतीमध्ये पुजाराकडे ससेक्सच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. कारण संघाचा नियमित कर्णधार टॉम हेन्स दुखापतीमुळे सामना खेळू शकलेला नाही.
कौंटीत खेळून पुजाराला पुन्हा सूर गवसला
ससेक्सकडून कौंटीत खेळताना पुजाराने या हंगामातील सात सामन्यांमध्ये 950 हून अधिक धावा केल्या आहेत. कौंटी क्रिकेटच्या जोरावरच पुजाराचे हिंदुस्थानी कसोटी संघात पुनरागमन झाले होते. खराब कामगिरीमुळे पुजाराला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले होते. संघातून वगळल्यानंतर त्याने ससेक्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती.




























































