
जगाच्या पाठीवर कुठे काय घडेल याचा काही नेम नाही. कोरोना महामारीच्या काळात ऑस्ट्रेलियातील एका जोडप्याने चक्क आपले राहते घर सोडून व्हिंटेज बसमध्ये संसार थाटत नवीन प्रवासाची सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियातील न्यूपॅसल येथील लॉरी ब्राऊन आणि ख्रिस हे यांची भेट सात वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले अन् त्यांनी लग्न केले. ते राहत असलेल्या फ्लॅटचे भाडे 800 पाऊंड होते. आपलं छोटंस घर असावं असं त्यांचं स्वप्न होतं. दोघांनाही आपली लाईफस्टाईल बदलायची होती. त्यातच गतवर्षी फेब्रुवारीत त्यांच्या नजरेस एक व्हिंटेज बस पडली. ही बस त्यांनी 5500 पाऊंडला खरेदी केली. आपल्या गरजांनुसार त्यांनी बस रिनोव्हेट केली आणि त्यातच आपला संसार थाटण्याचे त्यांनी ठरवले. लॉरी आणि ख्रिसच्या या घरात लवकरच नवीन पाहुणा येणार असून त्याच्या स्वागताची तयारी सुरू आहे.


























































