साताऱ्यात पर्यटनाला आलेल्या दाम्पत्याला मारहाण

साताऱ्याजवळील एकीव धबधब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजीतून घडलेल्या दोन युवकांच्या खुनाची घटना ताजी असतानाच, सडावाघापूरच्या उलटय़ा धबधब्याजवळ पर्यटनासाठी आलेल्या दाम्पत्याला बेदम मारहाणीची घटना घडली आहे.

पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहायला सातारा तालुक्याच्या एका गावातील दाम्पत्य गेले होते. त्यावेळी पतीला तिच्या पत्नीसमोरच सहाजणांकडून मारहाण करण्यात आली आहे. सडावाघापूरला गेल्यावर त्या ठिकाणी पवनचक्कीजवळ उभे राहून दोघांनी मोबाईलमधून काही सेल्फी काढले. त्यांच्याप्रमाणे धबधब्याच्या ठिकाणी इतर 5 ते 6 तरुणही फिरण्यासाठी आले होते. त्यांनी पत्नीकडे पाहून आरडाओरडा करण्यामुळे पतीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना जाब विचारला असता, त्या तरुणांनी पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.पतीला तरुणांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ती पुढे गेली असता, त्या तरुणांनी तिला धक्काबुक्की करत बाजूला ढकलले. पतीला मारल्यानंतर ते तरुण त्या ठिकाणाहून पसार झाले.