
सामना प्रतिनिधी । नांदेड
एका डॉक्टरच्या घरात भाडेकरु म्हणून राहणार्या पती-पत्नीने घरभाडे दिलेच नाही. उलट या दाम्पत्याने त्याला जाळून त्याचा खून केला. या प्रकरणात नवर्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
नांदेडमध्ये राहणारे डॉ.गणेश व्यंकटराव बामणे हे मूळ सुगाव ता.देगलूर येथील होते. मुगट गावात त्यांनी आपली स्वतःची इमारत बांधून त्या इमारतीमध्ये विवेकनिर्सग नावाचा दवाखाना सुरु केला होता. त्या इमारतीमध्ये दत्ता व्यंकट कल्याणे आणि त्यांची पत्नी भूमिता कल्याणे भाड्याने राहत होते. दाम्पत्याने अनेक महिने त्यांचे भाडे थकवले. त्यामुळे डॉ.गणेश बामणे हे आपले घरभाडे देण्यासाठी कल्याणे पती-पत्नीला सांगत होते. त्यातून वाद वाढत गेला आणि 6 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी डॉ.गणेश बामणे आपल्या इमारतीतील शौचालयात गेले असताना शौचालयाचे दार बाहेरुन बंद केल्याचा आवाज आला. आपली क्रिया आटोपताना त्यांच्या अंगावर रॉकेल पडत आहे याची जाणीव झाली. तेंव्हा डॉ.गणेश बामणेने खिडकीतून पाहिले तेव्हा दत्ता व्यंकट कल्याणे हा त्यांच्या अंगावर रॉकेल टाकत होता. काही वेळातच त्याने काडीपेटी ओढून आत फेकली आणि त्यामुळे भडका उडून डॉ.गणेश बामणे भाजले. दवाखान्यात उपचार घेताना त्यांनी दिलेल्या जबाबाप्रमाणे दत्ता व्यंकट कल्याणे (३८) आणि त्यांची पत्नी भूमिता दत्ता कल्याणे (२५) या दोघांनी त्यांना पेटवले होते.
डॉ. गणेश बामणे यांची प्रकृती गंभीर होती, त्यांना दुसर्या इस्पितळात हलवले असता १३ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुदखेड पोलिसांनी या प्रकरणी भादंविच्या कलम ३०२ आणि ३४ नुसार दत्ता व्यंकट कल्याणे (३८) आणि त्यांची पत्नी भूमिता दत्ता कल्याणे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला. मुदखेडचे पोलीस निरीक्षक सुर्यभान आम्ले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी या प्रकरणाचा तपास करताना दोघा पती-पत्नींना अटक केली. भुमिता कल्याणेला उच्च न्यायालयाने ८ डिसेंबर २०१५ रोजी जामीन दिला होता. पण दत्ता व्यंकट कल्याणे हे तुरुंगातच होते. डॉ.गणेश बामणे यांनी मृत्यूपूर्वी विशेष न्यायदंडाधिकारी आणि पोलिसांसमोर मृत्यूपूर्व जबाब दिला होता.
न्यायालयात हा खटला आल्यानंतर डॉ.गणेश बामणेचे जवळपास एक लाख रुपये घरभाडे देणे शिल्लक असताना दत्ता व्यंकट कल्याणेने त्यांचा जाळून खून केल्याची बाब सिध्द झाली.
न्यायाधीश एस.एस.खरात यांनी दत्ता व्यंकट कल्याणेला जन्मठेप आणि चार हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील आरोपी भुमिता दत्ता कल्याणेची सबळ पुराव्याअभावी मुक्तता झाली आहे.
























































